लांजा परप्रांतीय महिला खून प्रकरण
लांजा : इतराशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मामीचा गळा आवळून खून केल्याची कबुली भाचा निताई संजय मंडल याने पोलिसांसमोर दिली आहे. .राखी पलाश मोंडल (वय ३३) असे खून केलेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना ६ डिसेंबर रोजी लांजा तालुक्यातील इंदवटी भगतेवाडी येथे घडली होती. आपण केलेली हत्या उघडकीस येऊ नये म्हणून निताई याने मामीने किटकनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याचा बनाव रचला. मात्र पोलीस तपासात या परप्रांतीय कामगार महिलेचा गळा दाबून खून केल्याची बाब उघड झाली होती. त्यामुळे संबंधित तरुणावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान नीताई यानेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याला आता सोडण्यात आले असून त्याचा ताबा पोलिसांनी घेतला आहे. पोलिसांच्या तपासात त्याने मामी आणि तो नवरा बायकोप्रमाणे राहत होते. मात्र ज्या कामावर ती दोघं जात होती त्या कामावरील व्यक्तीशी मामीचे संबंध असल्याचा संशय निताई याला होता. या संशयावरून दोघांच्यात वारंवार खटके उडत होते. 6 डिसेंबर रोजी निताई याने रात्रीच्या सुमारास मामीचा गळा दाबून खून केला. मात्र तो खून नसून तिने आत्महत्या केली आहे हे भासवण्यासाठी तिच्या जवळ विषारी औषधांची बाटली ठेवली आणि स्वतः ही विष प्यायला. सकाळी ती दोघं कामावर आली नाही म्हणून एक कामगार त्यांच्या झोपडीजवळ गेला असता निताई हा तडफडत असल्याचे दिसले. तर दुसऱ्या बाजूला राखी ही निपचित पडलेली दिसून आली. कामगाराने इतरांना याची माहिती दिल्यानंतर त्यांच्या मदतीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र दुसऱ्या बाजूला राखी हिचा शवविश्चेदन अहवाल आला. यामध्ये निताई याने गळा दाबून तिचा खून केल्याचे लक्षात आले. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेला निताईला उपचारानंतर सोडण्यात आले. पोलिसांनी त्याचा ताबा घेतला. पोलीस ठाण्यात त्याची चौकशी केली असता त्याने खून केल्याची कबुली दिली. कामावरील व्यक्तींशी मामीचे सबंध असल्याचा संशय आल्याने तिचा खून केल्याचे त्याने सांगितले.