मुलांना पौष्टिक आहार, मेंदूला उत्तम खाद्य, मैदानी खेळ, वाचन याकडे फाऊंडेशनचे विशेष लक्ष
देवरूख : सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या चक्रभेदी सोशल फाउंडेशनतर्फे ग्रामीण भागात गावागावात लोकहिताचे कार्यक्रम होत आहेत. नुकताच संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथे पालक संवाद कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद लाभला.
चक्रभेदी सोशल फाउंडेशन संस्थेच्या तर्फे साडवली गावात पालक संवाद कार्यशाळा घेण्यात आली. भारतीय संविधान दिवसाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या जीवन कौशल्य कार्यशाळेचे फलित म्हणजे पालकांनी मागणी केल्याप्रमाणे पालक संवाद कार्यशाळा घेण्यात येत आहे. यावेळी साडवली येथील कार्यक्रमांत सायली त्रिभुवणे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कार्यक्रमांमध्ये यशदाच्या ट्रेनर व संस्थेच्या वैदेही सावंत यांनी एसडीजी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स याविषयीची माहिती सांगून महिला स्नेही व बालस्नेही गाव या संकल्पनेविषयी सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर उपस्थित सर्वांची चर्चा होऊन चक्रभेदी सोशल फाउंडेशनच्या मार्गदर्शनाखाली बालस्नेही विकास समिती स्थापन केली. मुलांना पौष्टिक आहार, मेंदूलाही उत्तम खाद्य तसेच मैदानी खेळ, वाचन याकडे जास्त लक्ष देणे हे या समितीचे उद्दिष्ट असेल. अशा प्रकारची समिती ही महाराष्ट्रात प्रथमच गठीत होत आहे. याचे स्नेहा गोखले यांनी कौतुक केले. या कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन कमिटीचे अध्यक्ष सचिन जाधव उपाध्यक्ष या रिया राजेश सासवडे, वैष्णवी विनोद जाधव, साक्षी सुवारे, सिमा भोजने, राजश्री दिनेश सावंत उपस्थित होते. सर्वांचे आभार मानून व राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.