तुमच्या गावात आहे का समिती?
रत्नागिरी : गरिबांचे धान्य काळ्या बाजारात विकले जाऊ नये, यासाठी ग्रामस्तरावर दक्षता समिती असतात. मात्र, अजूनही याबाबत गावांमध्ये या समितीबाबत माहिती नसल्याने असे प्रकार या समितीसमोर मांडले जात नाहीत. त्यामुळे गावात अशा समित्या आहेत की नाही याची कल्पना गावातील लोकांना नसते. अशी समिती गावात स्थापन करण्यात आली असेल तर काळा बाजार रोखता येणे शक्य आहे.
रेशन धान्य दुकानावर सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत वितरण करण्यात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंवर देखरेख ठेवण्यासाठी सरपंचाच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्तरावर दक्षता समिती स्थापन करण्याचे शासनाने २००८ साली आदेश दिले आहेत. या समितीचा सदस्य सचिव म्हणून तलाठी काम पाहतो. जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये या समिती स्थापन झाल्या आहेत. या समिती स्थायी असतात. मात्र, अशासकीय सदस्यांची नियुक्ती दर तीन वर्षांनी करावी लागते. परंतु, काही गावांमध्ये अशासकीय सदस्यांची मुदत संपली आहे. परंतु, मध्यंतरी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने या नियुक्ती झाल्या नाहीत. तसेच, पालकमंत्र्यांच्या शिफारशीने या नियुक्ती केल्या जातात. मात्र, अजूनही पालकमंत्र्यांची निवड न झाल्याने या सदस्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
दर महिन्याला बैठका घेऊन अहवाल तहसीलदारांकडे पाठवणे
ग्राम स्तरावरील दक्षता समितीच्या बैठका महिन्यातून एकदा होणे आवश्यक असते समितीच्या बैठका नियमित घेण्याची जबाबदारी समितीचे सदस्य सचिव म्हणजेच तलाठी यांची असते तसेच हा अहवाल तहसीलदारांकडे पाठवावा लागतो.
सरपंच आणि उपसरपंच यांचे रेशन दुकान असल्यास विविध कार्यकारी सोसायटीचे अध्यक्ष यांना या समितीचे अध्यक्ष म्हणून करता येते. रेशनच्या काळया बाजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षता समितीची ग्रामसभेतून निवड केली जाते. सरपंचाची अध्यक्षपदी निवड केली जाते. त्यामुळे गावात होणारा काळाबाजार रोखणे शक्य होणार आहे.