विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाचे तहसील कार्यालयावर धरणे
लांजा : बांग्लादेश येथे अल्पसंख्याक हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाज लांजाच्यावतीने मंगळवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी लांजा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करण्यात येऊन त्यानंतर याबाबतचे निवेदन लांजा तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना सादर करण्यात आले.
यावेळी सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बांग्लादेश मध्ये ५० जिल्ह्यांमध्ये हिंदू समाजावर दोन हजारहून अधिक जातीय हल्ले झाले आहेत. यामध्ये हिंदूंची घरे, त्यांचे व्यवसाय आणि मंदिरे यांच्यावरील हल्ल्यांचा समावेश आहे. या हल्ल्यांमध्ये असंख्य हिंदू बांधवांची घरे आणि व्यवसाय जाळून उध्वस्त करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे तेथे अल्पसंख्यांक हिंदू समाजाला रस्त्यावर आणले आहे. हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात आले आहेत. हिंदू महिलांवर सामूहिक अत्याचार झाल्याचा घटना देखील पुढे आल्या आहेत. काही ठिकाणी हिंदूंवर अत्याचार होत असताना बांग्लादेशाचे लष्कर स्वतः त्या अत्याचारांना सहकार्य करीत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून दृश्य समोर आले आहे.
त्यामुळे बांग्लादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवणे, मानवधिकाऱ्यांचे संरक्षण करणे आणि मानवाधिकाऱ्यांच्या बाजूने उभे राहणे आपल्या राष्ट्राचे आणि नागरिकांचे कर्तव्य आहे. आज भारताने एक राष्ट्र म्हणून बांग्लादेशमध्ये असुरक्षित असलेल्या हिंदूंच्या मानवाधिकारांचे संरक्षण मिळण्यासाठी अधिक प्रयत्न करावेत अशी भावना भारतातील हिंदू समाजाची आहे. बांग्लादेशमध्ये हिंदू समाजावर होणाऱ्या अत्याचारामुळे हिंदू समाजात प्रचंड रोष निर्माण झाला असून हिंदू समाजातील रोष या धरणे आंदोलनाच्या माध्यमातून व्यक्त करण्यात येत आहे.
बांग्लादेशमध्ये अल्पसंख्यांक हिंदू बांधवांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य ती भूमिका घेऊन अल्पसंख्यांक हिंदू हिताचे दृष्टीने योग्य ते पाऊल उचलावे, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदन सादर करताना विश्व हिंदू परिषद, बजरंग दलचे सर्व पदाधिकारी तसेच सकल हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.