गोकुळ सेवासंस्था तांबेडी- गवळवाडी व गोकुळ युवा क्रिकेट क्लब मुंबई यांच्यावतीने आयोजन
संगमेश्वर : कोकणातील बांधवांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी व परंपरा जपण्यासाठी कोकणातील (खेळे) नमन हा कार्यक्रम ठिकठिकाणी आयोजित केला जातो. गोकुळ सेवासंस्थेच्या पुढाकाराने ४ जानेवारीला सायंकाळी ७ वाजता मुंबईत घाटकोपर येथील झवेरबेन हॉलमध्ये नमन होणार आहे.
गोकुळ सेवासंस्था तांबेडी- गवळवाडी व गोकुळ युवा क्रिकेट क्लब मुंबई यांच्यावतीने अनेक वर्षे मुंबईसह चिपळूण-संगमेश्वर तालुक्यामध्ये अनेक कार्यक्रम राबवण्यात येतात. त्यामध्ये मुंबईत चिपळूण-संगमेश्वर भागातील समाजबांधवांसाठी क्रिकेट स्पर्धा भरवण्यात येते. पंचक्रोशीतील महिलांसाठी कौटुंबिक स्नेहमेळावा, हळदी-कुंकू, युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून उद्योजकता शिबिरे घेतली जातात. हे सर्व कार्यक्रम संदीप भालेकर यांच्या मोलाचे योगदान असते. ते सर्व युवकांसह मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कार्यक्रमाचे आयोजन करत असतात. भालेकर उबाठा सेनेचे हिंगोली विधानसभा संपर्कप्रमुख, कोकण महोत्सव सहसचिव म्हणून काम करतात. नमन कार्यक्रम राबवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे तसेच गावात व पंचक्रोशीतील युवकांना विश्वासात घेऊन एकत्र करत स्वतः पुढाकार घेऊन संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मदतीने भालेकर यांनी माजी मंत्री रवींद्र वायकर, माजी आमदार सदानंद चव्हाण, सुभाष बने, शिवसेना नेते भास्कर जाधव, विनायक राऊत, रोहन बने, अविनाश कांबळे यांच्या मदतीने पंचक्रोशीतील अनेक विकासकामेही करून घेतली आहेत. या कार्यक्रमाला महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात पुन्हा संधी मिळालेल्या आदिती तटकरे यांच्यासह नेते उपस्थित राहणार आहेत.