▪️पैसा फंड हायस्कुलला क्रीडा महोत्सव
संगमेश्वर : शालेय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या क्रीडा महोत्सवा मधून विद्यार्थ्यांमधील क्रीडा गुणांना प्रोत्साहन मिळते . याबरोबरच विद्यार्थ्यांमधील खिलाडू वृत्ती बळावते असे प्रतिपादन संगमेश्वर येथील व्यापारी पैसा फंड संस्थेचे सचिव धनंजय शेट्ये यांनी केले.
पैसा फंड इंग्लिश स्कूल संगमेश्वर येथे आज तीन दिवसांच्या क्रीडा महोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली. क्रीडा ध्वज फडकवल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना धनंजय शेट्ये हे बोलत होते. यावेळी पर्यवेक्षक दिलीप मोरगे, क्रीडा शिक्षक नवनाथ खोचरे, भालचंद्र भिडे, प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शपथ दिल्यानंतर क्रीडांगणावर कबड्डीच्या सामन्याचा शुभारंभ भालचंद्र भिडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.
तीन दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात लंगडी, गोळा फेक, बुद्धिबळ , लांब उडी, उंच उडी, खोखो, थाळीफेक असे विविध सामने खेळवले जाणार आहेत. क्रीडा महोत्सव नंतर २६ व २७ डिसेंबर रोजी प्रशालेत वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम आणि अल्पोपहार संपन्न होणार आहे.