चिपळूण : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चून चिपळूण रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण करण्यात आले. मोठमोठ्या प्रोफ्लेक्स सीट शेड, कोकणातील निसर्गसंपदा, जीवनशैलीचे पावलोपावली घडणारे दर्शन, उभारण्यात आलेली शिल्प यामुळे हे स्थानक चिपळूणच्या वैभवात भर टाकणारे ठरत असताना प्रवेशद्वारासमोरील सुशोभिकरणी नासधूस करण्यात आली आहे. सुशोभिकरणातील वाघाचे शेपूट कुणीतरी तोडून टाकले तर सांबराची शिंगेच उपटून टाकण्यात आली.
तत्कालीन मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कोकण रेल्वे मार्गावरील पर्यटनदृष्टया महत्वाच्या आणि प्रवाशांची सातत्याने वर्दळ असणाऱ्या 12 रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरणाचे काम पहिल्या टप्प्यात करण्यात आले. त्यामध्ये चिपळूण रेल्वेस्थानकाचा समावेश आहे. चिपळूण रेल्वेस्थानक आणि त्याच्या आजूबाजूचा विस्तीर्ण परिसर लक्षात घेऊन त्यादृष्टीने सुशोभिकरणा आराखडा तयार करण्यात आला. सुमारे साडेपाच कोटी रुपये खर्चून सध्याचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. या सुशोभिकरणात वन्यप्राणी, जलचर, कोकणी संस्कृतीमध्ये असलेली दुभती जनावरे आदींची शिल्प (स्टॅच्यू) प्रवेशद्वाराच्या भव्य प्रांगणातच फुलझाडांनी सुशोभित व स्थानिक वृक्षराजींनी असलेल्या बगीच्यामध्ये उभारण्यात आली आहेत. संपूर्ण सुशोभिकरणासाठी जांभा दगडाचा अत्यंत रेखीव, आकर्षक धाटणीच्या पद्धतीने वापर करण्यात आला आहे. प्रवासी मार्गावर तसेच स्थानक परिसराभोवती असलेल्या भिंतीवर कोकणी संस्कृतीची ओळख सांगणारी भित्तीचित्रे रंगवण्यात आली आहेत.
दरम्यान, सुशोभिकरणचे उद्घाटन 2 ऑक्टोबरला झाले. यापुढे वर्षभर त्याची देखभाल दुरूस्ती ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जात आहे. असे असताना प्रवेशद्वारासमोर सुशोभित करण्यात आलेल्या बगीच्यामधील वाघाचे शेपूट तोडण्यात आले आहे. तर सांबराची शिंगे उपटण्यात आली आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिंगे तुटलेले सांबर, शेपूट तूटलेला वाघ आजही तशा अवस्थेत आहेत. आता बांधकाम विभागाकडून तुटलेले अवयव जोडण्यात येणार आहेत.