दापोली पोलिसांची कारवाई, तीन दिवस होते बारीक लक्ष
दापोली : तालुक्यातील हर्णे येथे डिझेलची तस्करी करणाऱ्या बोटीवर छापा टाकून पा जणांना अटक करण्यात आली. या प्रकरणात सुमारे 30 हजार लिटर डिझेलसह 47 लाख 62 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल दापोली पोलिसांनी जप्त केला. ही घटना रविवारी संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास घडली. हर्णे जेटी येथे अवैधरित्या डिझेलची तस्करी केली जात असल्याची माहिती गुप्त यंत्रणेद्वारे दापोली पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गेले तीन दिवस पोलीस समुद्रावरील संशयित हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून होते. अखेरीस रविवारी त्यांच्या प्रयत्नांना यश आले.
वामन पोशिराम रघुवीर, (37 रा. हर्णे), हातीन केसरीनाथ कोळी (34), दर्शन अनंत कोळी, (35 दोघे रा. बोडणी, रेवस ता. अलिबाग), संदीपकुमार मिठाईलाल मिसाद, (32), शिव्य प्रमोद मिसाद (19, दोघे रा. झापराबाद, जोनपूर, उत्तर प्रदेश) अशी या प्रकरणात अटक केलेल्यीं नावे आहेत.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हर्णे बंदर येथे एका मासेमारी नौकेतून अवैधरित्या विक्री करण्यासाठी डीझेल सदृश द्रवपदार्थ आणला असल्याची माहिती दापोली पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी रविवारी सायंकाळी 5 वाजता हर्णै बंदर येथे आपल्या पथकासह धाव घेतली. समुद्रात जाण्यासाठी त्यांच्याकडे स्पीड बोट उपलब्ध नव्हती. दाभोळवरून स्पीड बोट मागवून ती येईपर्यंत वाट पाहणेदेखील शक्य नव्हते. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पर्यटन व्यवसाय करणाऱया स्थानिकांच्या मदतीने त्यांच्याकडे असणाऱ्या स्पीड बोटीच्या सहाय्याने समुद्रात जाण्याचा धाडसी निर्णय या पथकाने घेतला.