रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या कंत्राटी भरतीसाठी समुपदेशन प्रक्रीया जवळजवळ पूर्ण झाली आहे. फक्त नियुक्ती पत्र देणे बाकी आहे. ही प्रक्रिया सुरु असतानाच राज्यातील अन्य दोन जिल्ह्यातील कंत्राटी भरती स्थगित केल्याचे पुढे आले आहे. हा निर्णय रत्नागिरीतही लागु झाल्यास ही भरती प्रक्रिया स्थगित होण्याची शक्यता आहे. या भरतीत बहुसंख्य स्थानिक डीएड, बीएड धारक उमेदवारांना त्याचा फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जि.प.प्रशासनस्तरावर या भरती प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात 106 जणांना नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात सुमारे चारशे ठिकाणी नियुक्ती देण्यासाठी समुपदेशन प्रक्रीया सुरु आहे. जिल्हा परीषद प्राथमिक शाळांमधील रिक्त पदांवर कंत्राटी शिक्षक भरण्याची प्रक्रीया अंतिम टप्प्यात आली आहे. आंतरजिल्हा बदल्या, सेवानिवृत्त होणारे शिक्षक आणि विलंबाने झालेली शिक्षक भरती यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे दिवसेंदिवस वाढतच होती.
गेल्या निवडणुकीपुर्वी रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना एक हजार नवीन शिक्षक मिळाले होते. मात्र ही भरती झाल्यानंतर काही शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने कार्यमुक्त करण्यात आले. परिणामी जिल्ह्यातील रिक्त पदांची संख्या पुन्हा 900 पेक्षा अधिक झाली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्य शासनाने कंत्राटी पध्दतीने नियुक्त्या द्याव्यात असा निर्णय घेतला. त्याप्रमाणे नियुक्ती प्रक्रियाही सुरु झाली होती. परंतु आचारसंहितेमुळे त्यात खंड पडला होता.
निवडणूक झाल्यानंतर रत्नागिरी जिल्हापरीषदेने 506 रिक्त पदांवर कंत्राटी पध्दतीने शिक्षक नियुक्ती केली जाणार होती. त्यातील 106 जणांना नियुक्तीही दिली गेली. उर्वरित 400 पदांवर नियुक्ती देण्यासाठी तालुकास्तरावर समुपदेशन प्रक्रीया सुरु केली गेली. मात्र मागील आठवड्यात झालेल्या शिक्षण विभागाच्या दृकश्राव्य पध्दतीने झालेल्या बैठकित वरिष्ठ अधिकाऱयांनीही तोंडी सुचना देत ही प्रक्रिया वेगाने करु नका असे सांगितले आहे. मात्र रत्नागिरी जिह्यातील समुपदेशन प्रक्रीया जवळजवळ पूर्ण झाली आहे. फक्त नियुक्ती पत्र देणे बाकी आहे. ही प्रक्रिया सुरु असतानाच दोन जिह्यात कंत्रीटी भरती स्थगित केल्याचे पुढे आले आहे. त्यांचाच निर्णय रत्नागिरीतही लागु होण्याची शक्यता आहे.