ग्रामस्थांचा इशारा
संगमेश्वर : कडवई तुरळ रस्त्याच्या कामाला आठ दिवसात सुरुवात न झाल्यास आंदोलन करण्याचा ठराव सर्वानुमते करण्यात आला. कडवई तुरळ रस्त्याच्या कामाला गेल्या वर्षी मंजुरी मिळाली होती.हा रस्ता रत्नागिरी जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येतो. कामाला सुरुवात १८ फेब्रुवारी २०२४ ला सुरुवात झाली. रस्ता तुरळ, कडवई,चिखली, तांबेडी ते कळंबस्ते असा असून या कामासाठी 2 कोटी, 44 लाख, 44 हजार, 520 रुपये इतका निधी मंजूर आहे. तरीही रस्त्याचे काम अतिशय संथ गतीने सुरू होते. परिणामी बीबीएमच्या कामाला सुरुवात झाली तेव्हा मे महिना संपत आला.काम सुरू झाले आणि पाऊस पडू लागला. भर पावसात काम केल्याने अल्पावधीतच रस्त्याला जागोजागी खड्डे पडू लागले.या खड्ड्यातून प्रवास करणे जिकीरीचे झाले आहे. कडवईत सुमारे सवाशे रिक्षा चालक आहेत.रिक्षा चालक,दुचाकी चालक यांना वाहतून करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार सूचना देऊनही रस्त्याच्या कामात चालढकल होत आहे. रोजच्या त्रासाला कंटाळून वाहन चालकांच्या तक्रारी ग्रामपंचायतीकडे येत होत्या.
सोमवारी पार पडलेल्या मासिक सभेत रस्त्याच्या कामाबाबत चर्चा झाली असता आठ दिवसात कामाला सुरुवात न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी सरपंच विशाखा कुवळेकर, उपसरपंच दत्ताराम ओकटे,माजी सरपंच वसंत उजगावकर व सर्व सदस्य उपस्थित होते.