जयगड वायू गळती प्रकरण
रत्नागिरी : जयगड येथील वायूगळती प्रकरणात आता आणखी माहिती समोर आली आहे. रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतलेल्या 17 विद्यार्थ्यांना पुन्हा त्रास जाणवू लागल्याने पुन्हा रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गुरुवार 12 डिसेंबर रोजी जयगड माध्यमिक विद्यामंदीर आणि कनिष्ठ महाविद्यालयात मोठी दुर्घटना घडली होती. दुपारनंतर अचानक गॅस गळतीमुळे विद्यार्थ्यांना श्वसनाचा त्रास, उलटय़ा मळमळ जाणवु लागल्याने. शाळेतील शिक्षक, पालक आणि जयगड पोलिसांनी या विद्यार्थ्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. रात्री उशिरापर्यंत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 68 इतकी होती. त्यांच्यावर उपचार करून जिल्हा शासकिय रुग्णालयातून रविवार 15 डिसेंबर रोजी सर्व मुलांना घरी सोडण्यात आले होते. मात्र सोमवारी यापैकी काही मुलांची तब्येत पुन्हा खालावल्याने व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने पालकांनी त्वरित रत्नागिरीतील एका खाजगी रूग्णालयात दाखल केले आहे. या वायूगळती घटनेनंतर परीसरातील पालक चांगलेच धास्तावलेले आहेत. या घटनेनंतर सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हाप्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाला भेट दिली.