कऱ्हाडे ब्राह्मण संघात पुरस्कारांचे वितरण
रत्नागिरी : जपानमध्ये वैयक्तिक यशापेक्षा सांघिक यश साजरे केले जाते. तसे आपल्याकडे नाही. वर्गाबाहेर चप्पल, बूट शिस्तीत काढून ठेवण्याचा संस्कार ते विसरत नाहीत. पण आपल्याकडे शिस्त विसरली जाते. त्यामुळे आता समाजाने सर्वोत्तमाचा ध्यास घेतला पाहिजे. ज्या ज्या वेळी भारतीय समाजाने ठरवले, त्यावेळी हे शक्य झाले आहे, हे इतिहासावरून दिसून आले आहे. भारत आता बदलत आहे. वाहतूक व्यवस्था बदलत आहे. मोबाईल इथेच बनवले जात आहेत. त्यामुळे आपल्या कामात सर्वोत्तमाचा ध्यास ठेवा, असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक, विचारवंत डॉ. उदय निरगुडकर यांनी केले.
रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे रविवारी राणी लक्ष्मीबाई सभागृहात वार्षिक पुरस्कार वितरण कार्यक्रमात श्री. निरगुडकर बोलत होते. व्यासपीठावर संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये, ज्येष्ठ करसल्लागार चंद्रकांत हळबे, अॅड. प्रिया लोवलेकर, प्रतिभा प्रभुदेसाई, सचिव शिल्पा पळसुलेदेसाई आदी उपस्थित होत्या. राणी लक्ष्मीबाई व सरस्वतीच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. त्यावेळी पुरोहितांनी मंगलाचरण सादर केले. त्यानंतर श्री. हिर्लेकर यांनी डॉ. उदय निरगुडकर यांचा पुष्पगुच्छ आणि राणी लक्ष्मीबाईंची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला.
गावांमध्येच चार-पाच पिढ्या राहून उद्योग व्यवसाय करणाऱ्या आपल्या ज्ञातीबांधवांचा शताब्दीनिमित्त सत्कार व विशेष पुस्तिका तयार करावी, अशी सूचना डॉ. निरगुडकर यांनी केले. ते म्हणाले की, पुढच्या दहा वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर पोहोचणार आहे. त्यासाठी प्रत्येकाचे योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. सार्वजनिक पर्यायाने जगाचे कल्याण करण्याचा विचार भारतात आहे. जगातील अन्य देशांनी आक्रमणे करून इथली संपत्ती, सोने-नाणे लुटून नेले परंतु भारतीयांच्या हाडा-मासांत, गुणसूत्रांमधील कोणतीही गोष्ट हिरावून नेणे शक्य झाले नाही. आज आपण सर्वांनीच करत असलेल्या कामात सर्वोत्तमाचा ध्यास समोर ठेवून कार्यरत राहावे. पुढची पाच वर्षे त्यासाठी महत्त्वाची आहेत.
या वेळी संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी प्रास्ताविकामध्ये शतक महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या कऱ्हाडे ब्राह्मण संघाची माहिती दिली. सौ. प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी पितांबरी उद्योग समूहाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमात देणगीदारांचाही सन्मान करण्यात आला.
यांना केले सन्मानित
राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आर्या मदन डोर्लेकर, धन्वंतरी पुरस्कार डॉ. सौ. छाया अरुण जोशी (राजापूर), आदर्श पौरोहित्य पुरस्कार वे. मू. श्रीकृष्ण जगन्नाथ पाध्ये (लांजा), आदर्श कीर्तनकार पुरस्कार हभप रोहन भालचंद्र पुराणिक (वेंगुर्ला), आचार्य नारळकर पुरस्कार सौ. रुचा राकेश हर्डीकर (आडिवरे, राजापूर), कृषी संजीवन पुरस्कार प्रसाद पुरुषोत्तम पाध्ये (पाथर्डी, चिपळूण) यांना प्रदान करण्यात आला. तसेच उद्योगिनी पुरस्कार सौ. सई सुरेंद्र ठाकुरदेसाई (गोळप, रत्नागिरी) आणि उद्योजक पुरस्कार वरद गोपाळ खांडेकर (बुरंबाड, संगमेश्वर) यांना देऊन गौरवण्यात आले. सत्कारमूर्तींनी संघाचे विशेष आभार मानले. कोणत्याही अर्जाशिवाय दिलेले हे पुरस्कार लाखमोलाचे आहेत, असे सांगितले. काही जण मनोगत व्यक्त करताना भावुक झाले होते.