रायगड : रायगड, पनवेल तालुक्यातील तळोजा मध्यवर्ती कारागृहामध्ये शिक्षा भोगत असलेल्या कैद्याच्या भावाकडून १० हजार रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपाखाली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी निवृत्ती कन्नेवाड व पोलीस शिपाई राहुल गरड यांना अटक केली.
यापूर्वीही तक्रारदार यांच्याकडून आरोपीने गुगल पेद्वारे रक्कम घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे… दोन्ही आरोपी सध्या एसीबीच्या कोठडीत आहेत… एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांचा भाऊ हा २०१८ पासून नवी मुंबईतील तळोजा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत बंदी आहे… तक्रारदार यांच्या भावाने ११ डिसेंबर रोजी तक्रारदार यांना दूरध्वनी करून तुरुंग अधिकारी कन्नेवाड हे पैसे मागत असून पैसे न दिल्यामुळे खूप त्रास देत आहेत, असे सांगितले… त्यानंतर एका मोबाईल क्रमांकावरून तक्रारदार यांना १२ डिसेंबरला पैशांबाबत व्हॉट्सअप संदेश व दूरध्वनी आला. त्या मोबाईल क्रमांकावर तक्रारदार यांनी एक हजार रुपये गुगल पेद्वारे पाठवले. त्यानंतर पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली. तक्रारदार यांनी १३ डिसेंबरला याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली… त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पडताळणी केली. त्यावेळी आरोपी पोलीस शिपाई राहुल गरड यांनी १० हजार रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात राहुल गरड याने १० हजार रुपयांची लाच स्वीकारली… त्यानंतर कन्नेवाड यांनी गरड यांच्याकडून १० हजार रुपये स्वीकारताना पकडण्यात आले…पुढील तपास लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, नवी मुंबई यांच्याकडून करण्यात येत आहे.