ग्रामस्थांचे शाळा बंद आंदोलन स्थगित, आजपासून सुरू होणार जैतापूर प्राथमिक शाळा
राजन लाड / जैतापूर
राजापूर तालुक्यातील जैतापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक 1 मध्ये एकच शिक्षक आहेत. परंतु तेही पूर्णवेळ नसल्याने विद्यार्थांची गैरसोय होत होती. या शाळेवर पूर्णवेळ शिक्षक तसेच आणखी एक शिक्षक द्यावा अशी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार मागणी केली होती. मात्र प्रशासनाकडे वारंवार विनंती करूनही शाळेवर नियमित शिक्षक मिळत नसल्यामुळे शाळा बंद आंदोलनाचा निर्धार पालकांनी केला होता. शाळेच्या गेटवर मुलांना घेवून गजर करणार करण्यात येणार असल्याचे प्रशासनाला कळवले होते. यानंतर प्रशासनाकडून दखल घेत या शाळेवर दोन शिक्षक दिल्याने ग्रामस्थांनी पुकारलेले शाळा बंद आंदोलन स्थगित करण्यात आले.
जि. प .शाळा जैतापूर नंबर 1 या सेमी इंग्रजी शाळेमध्ये एक पूर्णवेळ शिक्षक आणि एक सहाय्यक शिक्षक आवश्यक असताना गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ एक कामगिरीवरील शिक्षक आणि तेही अदलुन बदलून कार्यरत असून प .सं .गटशिक्षणाधिकारी राजापूर यांच्याकडे वारंवार विनंती करून देखील या शाळेला शिक्षक मिळालेले नव्हते. यासाठी पालक वर्ग तसेच जैतापूरचे सरपंच यांनी दोन ते तीन वेळा प्रत्यक्ष भेटून विनंती देखील केली होती. त्यावेळी चार-पाच दिवसात दोन शिक्षक देतो असे तोंडी सांगितले होते. मात्र त्यानंतरही या शाळेला दोन शिक्षक प्राप्त झालेले नव्हते.
कामगिरीवरील शिक्षकांमुळे तसेच वारंवार बदलून येणाऱ्या शिक्षकांमुळे आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने तसेच वारंवार विनंती करून देखील दुर्लक्ष करीत असल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आणि पालक सोमवार 16 डिसेंबर 2024 पासून शाळा बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला होता. पाल्यांना शाळेत न पाठवता शाळेच्या गेट बाहेर राहून शांततेच्या मार्गाने करणार असल्याचे निवेदन गटशिक्षणाधिकारी राजापूर यांना देण्यात आले होते. त्याची प्रत माहितीसाठी सरपंच ग्रामपंचायत जैतापूर, गटविकास अधिकारी राजापूर, आमदार किरण सामंत यांना देण्यात आली होती.
सोमवार 16 डिसेंबर पूर्वी शाळेला दोन शिक्षक देण्याचे लेखी पत्र मिळाल्यास आम्ही शाळा बंद आंदोलनाचा फेरविचार करू असेही म्हटले होते. तसेच आपण आमच्या मागणीचा विचार न केल्यास होणाऱ्या आंदोलनास आणि आमच्या पाल्यांच्या नुकसानीस आपण जबाबदार असाल असेही कळविले होते.
राजापूर गट विकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांनी याची दखल घेत जोपर्यंत कायमस्वरूपी दोन शिक्षक नेमणूक होत नाहीत तोपर्यंत दोन कामगिरीवरील शिक्षक देत यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला असून पालकांनीही ते मान्य करीत आपले आंदोलन स्थगित केले आहे.
यावेळी जैतापूर सरपंच राजप्रसाद राऊत, व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा स्वरांजली करगुटकर, शिक्षण प्रेमी सदस्य आणि माजी अध्यक्ष राकेश दांडेकर, पोलीस निरीक्षक खेडक, जैतापूर बीट अंमलदार हुजरे , गांगुर्डे, पोलीस पाटील सौ .मांजरेकर यांसह पालक परेश मांजरेकर, प्रितेश देवळेकर, अमित पडवळ, शुभांगी आखाडे, प्रदीप घाडी, दिपिका, करगुटकर, दीक्षा भिवंदे, पूर्वा पवार , पूर्वा भूते, स्वाती लाड, सम्रुद्धि तिर्लोटकर, सानिका लाड, गजानन मांजरेकर आदींसह पालक आंदोलनाच्या तयारीने उपस्थित होते.
आंदोलन स्थगित केल्याबद्दल राजापूर गटविकास अधिकारी जगताप यांनीदेखील सर्व पालकांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत. तर पालकांनी प्रशासनापर्यंत आपला आवाज पोहचविल्याबद्दल प्रसिद्धी माध्यमांचे आणि सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत .