मार्गशीर्षमध्ये पाले भाज्यांचेही दर भडले गगनाला, पालेभाजी 35- 40 रुपये जुडी
रत्नागिरी : भाज्यांच्या दरवाढीमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. कांदा ६५ ते ७०, बटाटा ३० ते ३५ तर भाज्यांनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या ताटातील भाज्याच गायब झाल्या आहेत.
मार्गशीर्ष मास सुरू असून, अनेक भाविक संपूर्ण मास शाकाहार अवलंबतात. भाविक उपवास करीत असल्यामुळे भाज्यांना मागणी वाढली आहे. शिवाय लग्नसराईसुद्धा सुरू झाली आहे. गवार, फरसबी, घेवडा, मटार, सिमला मिरची, शेवग्याने शंभरी ओलांडली आहे. बाजारात भाज्यांची आवक वाढली आहे, मात्र दर ‘जैसे थे’ आहेत. पालेभाज्यांची जुडी ३० ते ४० रुपये दराने उपलब्ध आहे. घाऊक बाजारातच दर वाढल्यामुळे किरकोळ विक्रीवर परिणाम झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. बाजारात नवीन व जुना कांदा उपलब्ध आहे. नवीन कांद्याच्या दरापेक्षा जुन्या/वाळलेल्या कांद्याचे दर अधिक आहेत.