मच्छीमारांमध्ये तीव्र नाराजी, माशांचे दर वधारले
रत्नागिरी : परप्रांतीय -वेगवान मलपी नौकांच्या बेछूट मासेमारीचा फटका रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमारांना बसला आहे. कोकण किनाऱ्यावरील पापलेट मासा गायब झाला आहे. समुद्राच्या तळापासून पृष्ठभागावरील लहान, मोठा मासा मलपी नौका पकडत आहेत. त्यामुळे गेल्या वर्षभरापासून स्थानिक मच्छीमार नौकांना पापलेट मासा मिळेनासा झाला आहे. त्यामुळे सध्या मिळणाऱ्या माशांचे दर वधारलेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याला १६७ किमीचा समुद्र किनारा लाभला आहे. येथील मासा चविष्ट असल्याने त्याला चांगला दर मिळतो. त्यामुळे तामिळनाडू, कर्नाटक या ठिकाणच्या मलपी नौका या सागरी क्षेत्रात घुसून समुहाने मासेमारी करतात. एकाच ठिकाणी ४० ते ५० नौका मासेमारी करून समुद्राच्या तळापासून पृष्ठभागापर्यंतचा मासा पकडून नेतात.
अगदी महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रात म्हणजे १२ नॉटीकल मैल अंतराच्या आत येऊन या नौका मासेमारी करतात. त्यामुळे स्थानिक नौकांना मासा मिळेनाशी झाली आहे. गेल्या वर्षभरापासून पापलेट मासा फारच तुरळक प्रमाणात मिळत आहे. सध्या बोंबील, घोळ मासाही मिळत नाही. पूर्वी घोळ मासा गरी टाकूनही मिळत होता. मात्र गेल्या काही वर्षात परप्रांतीय मलपी नौकांच्या अतिरेकी मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांना मोठा फटका बसला आहे. सध्या काही प्रमाणात मासे मिळत असून त्यांचे दरही वधारलेले आहेत. छोटा पापलेटचा दर १ हजार रुपये प्रतिकिलो आहे.