लांजा : मागील एक महिन्यापासून बेपत्ता असलेल्या ४३ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत लांजा शहरातील गोंडेसखल गुरववाडी भूतादेवीच्या जंगलात आढळून आला. गळफास घेतल्याने केवळ कवटीचा भाग गळफासाच्या दोरीमध्ये अडकलेल्या अवस्थेत व बाकीचा भाग जमिनीवर कुजलेला पोलिसांना आढळून आला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची खबर पत्नी अश्विनी अनिल गुरव (वय ३२, मुळगाव सत्येश्वरमंदिराजवळ गुरववाडी वनगुळे, सध्या राहणार डावारा वसाहत शिंदे चाळ लांजा) हिने लांजा पोलिसांना दिली. तिचा नवरा अनिल अनंत गुरव (वय ४३) हा गेल्या पाच ते सहा वर्षांपासून मानसिक स्थिती बिघडल्याने तो वेड्यासारखा वागत असायचा. वेडाच्या भरात घरातून निघून जायचा आणि पुन्हा दोन-चार दिवसांनी घरी परत यायचा. साधरणतः पाच महिन्यापूर्वी २७ जून रोजी तो बेपत्ता झाल्याची नोंद लांजा पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यानंतर लांजा पोलिसांनी त्याचा शोध घेतला होता. त्यावेळी तो गोंडेसखल गुरववाडी येथे आढळुन आला होता. त्यानंतर तो पुन्हा दोन वेळा घरातून गायब झाला होता.
अशाप्रकारे तो घरातून निघून जायचा व दोन-चार दिवसांनी पुन्हा घरी यायचा. अशातच १० नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी १२ वाजण्याच्या दरम्याने पत्नी अश्विनी हिला फिरून येतो, असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र तो घरी आला नव्हता. मात्र सर्वत्र शोधाशोध करून देखील त्याचा ठिकाणाला सापडला नव्हता. घरातून वारंवार निघून जाण्याची सवय असल्याने पत्नी अश्विनी हिने लांजा पोलिसांना याबाबतची माहिती दिली नव्हती.
दरम्यान, १४ डिसेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्याने पत्नी अश्विनी हिला गोंडेसखळ गुरववाडी येथील भुतादेवीचा जंगलामध्ये किंजळीच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत तो आढळून आला. कुजलेल्या स्थितीत कवटीचा भाग गळफासामध्ये दोरीला अडकला होता आणि बाकीचा भाग कुजून जमिनीवर पडला होता. अनिलच्या अंगावरील कपडे आणि पायातील चपला वरून त्याची ओळख पटविण्यात आली.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोद सरंगळे हे करत आहेत.