सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षकांची कारवाई
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस दलाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सिंधुदुर्ग येथे पोलीस दलामध्ये व्हीआयपी लोकप्रतिनिधींच्या गाडीवर चालक म्हणून असलेल्या या महिलेने राज्यात चांगली प्रसिद्धी मिळवली होती. मात्र पैशाच्या हव्यासापोटी सारं गमावण्याची वेळ या महिला पोलिस तृप्ती मुळीक हिच्यावर आली आहे. कोल्हापूर येथे ८५ लाखांची फसवणूक, नरबळी व जादुटोणा आदींचा वापर केल्याप्रकरणी कोल्हापूर पोलिसांनी मुळीक हिला सिंधुदुर्गात अटक केली. या घटनेने सिंधुदुर्गात खळबळ उडाली. याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दलातील पोलिस चालक कर्मचारी तृप्ती मुळीक हिचे जिल्हा पोलिस अधीक्षकांनी शुक्रवारी निलंबन केले.
तिला कोल्हापूर येथील न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिसांनी तिच्या निलंबनाची कारवाई केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह आमदार उदय सामंत अशा अतिमहनीय व्यक्तींना असलेल्या डीव्ही कारची वाहन चालक म्हणून केलेल्या कामामुळे तृप्ती मुळीक प्रकाशझोतात आली होती. कोल्हापूर येथील या फसवणूक प्रकरणात तिचा हात असल्याचे व पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर सिंधुदुर्ग पोलिस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना धक्का बसला होता.
गंगावेश कोल्हापूर येथील सुभाष हरी कुलकर्णी यांनी कोल्हापूर पोलिस ठाण्यात आपल्याला झालेल्या फसवणूक प्रकरणाबाबत ३ नोव्हेंबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार एकूण नऊ संशयितांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सिंधुदुर्ग पोलिस अंमलदार असलेल्या तृप्ती संजय मुळीक (३२ रा. मूळ दरवेश पाडळी, ता. हातकणंगले जि. कोल्हापूर व सध्या राहणार सिद्धिविनायक पार्क, दुसरा मजला, ओरोस) ही सहा नंबरची संशयित आरोपी आहे. तृप्ती मुळीक हिच्यासह दीपक पाटणकर, अण्णा उर्फ नित्यानंद नायक, धनश्री काळभोर, शशिकांत गोळे, कुंडलिक झगडे, ओमकार पाटणकर, भारत पाटणकर, हरीश राऊत असे एकूण नऊ आरोपी आहेत. या सर्वांवर भादवि. कलम ३८४, ३८६, ४१९, ४२०, ३४ सह नरबळी इतर अमानूष अघोरी प्रथा व जादुटोणा आदीचा वापर करून ८४ लाख ६९ हजार रुपयांची फसवणूक झाल्याच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे