दापोली : तालुक्यातील द फर्न समाली रिसॉर्ट येथे कार्यरत असणारा राजू कोळी या 33 वर्षीय तरुण कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना 12 डिसेंबर रोजी घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू कोळी हा समाली रिसॉर्टमध्ये कार्यरत होता. तो जयपूर-राजस्थान येथील मूळचा राहणारा होता. तो 11 डिसेंबर रोजी रात्री 11.15 च्या सुमारास हॉटेलमधून जेवून त्याच्या रूमवर जाऊन झोपला. त्यानंतर 12 डिसेंबर रोजी दुपारपर्यंत तो झोपूनच होता. जेवण करण्यासाठीही न उठल्यामुळे त्याला त्याचा मित्र विजयकुमार हा ड्युटी संपवून रूमवर आल्यावर उठवण्यासाठी गेला तेव्हा तो काहीच हालचाल करीत नव्हता म्हणून त्याला तत्काळ हॉटेलच्या गाडीतून दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यानी तपासणी करून तो मृत असल्याचे घोषित केले. दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.