सुदर्शन जाधव / चिपळूण
चिपळूण मधील कापरे येथील ग्रामसेवक गणेश लोखंडे यांची जिल्हा बदली झाल्यावर त्यांच्या झालेल्या शुभेच्छा कार्यक्रमात साऱ्या ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. एका ग्रामसेवकाची बदली झाल्यानंतर गावकऱ्याना अश्रू अनावर होण्याची बाब ही त्या ग्रामसेवकाने केलेल्या कामाची पोचपावतीच ठरली आहे.
ग्रामसेवक लोखंडे हे कापरे ग्रामपंचायतीत 11 ऑक्टोबर 2017 मध्ये रूजू झाले. त्यांचे बंधू लांजा येथे सेवेत असतानाच निधन झाल्याने अनुकंपावर त्यांची नियुक्ती झाली होती. कापरे येथे ग्रामसेवक म्हणून त्यांनी सुरूवातीपासूनच झोकून देत काम करण्याची भूमिका स्वीकारली. नम्र स्वभावाने घरा-घरातील ग्रामस्थ, महिला, वडीलधारी मंडळी आणि युवकांशी जिव्हाळयाचे नातेसंबंध जोपासले. गरजूपर्यंत शासकीय योजना पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. कोणी विरोधात भूमिका घेतली तरी त्यांचा नम्रपणे स्वीकार करीत योग्य ते काम करण्याची भूमिका घेतली. सातत्याने त्यांनी गरजूंना मदत करण्यावर भर दिला. ग्रामस्थांशी सलोख्याचे संबंध ठेवले. कुटुंबातील व्यक्तीप्रमाणेच प्रत्येकाला सन्मानाची वागणूक दिली. या कामाची पोहोचपावती लोखंडे यांच्या निरोपसमारंभावेळी दिसली. ग्रामसेवक लोखंडे यांची जिल्हा बदली झाल्याने कापरे ग्रामपंचायतीत नुकतेच निरोप समारंभाचे आयोजन केले होते. त्यासाठी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह वाडी-वाडीतील ग्रामस्थ, बचत गटाच्या महिला, पंचायत समितीचे माजी सदस्य, ग्रामस्थ, विविध मंडळे, ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी उपस्थिती लावली होती. यानिमित्ताने गावातील जे अधिकारी निवृत्त झाले, त्यांचाही सन्मान करण्यात आला. यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ शिक्षक बळीराम मोरे यांचाही समावेश होता.
यावेळी विशेषत ग्रामसेवक लोखंडे यांना निरोप देताना सर्वजण भावूक झाले. त्यांची स्थानिक पातळीवर बदली झाली असती तर वरिष्ठ अधिकाऱ्याना भेटून ती रद्द करण्याची विनंती केली असती, अशा भावनाही ग्रामस्थांसह पदाधिकाऱ्यानी व्यक्त केल्या. एखाद्या ग्रामसेवकांची बदली झाल्यावर ग्रामपंचायतीतर्फे निरोप समारंभाचे सोपस्कार पार पडतात. मात्र निरोप समारंभात वाडी-वाडी तर्फे सन्मान होतानाच ग्रामस्थांना अश्रू अनावर होण्याची घटना ही वेगळीच ठरली आहे. ग्रामस्थांप्रमाणेच गावातून निघताना ग्रामसेवक लोखंडे यांनाही तितेच अश्रू अनावर झाले होते. यानिमित्त लोखंडे यांचा आई, वडील, पत्नी समवेत सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.