धावणे, पोहणे, सायकलिंगमध्ये 17 तासांचा कालावधी असताना 13 तास 52 मिनिटांमध्ये स्पर्धा केली पूर्ण
चिपळूण : ऑस्ट्रेलियामधील बसलटन येथे झालेल्या जागतिक आयर्नमॅन स्पर्धेमध्ये डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी यश मिळवत आयर्नमॅन किताब पटकावला. 3.8 कि.मी. पोहणे, 180 कि.मी. सायकलिंग आणि 42.2 कि.मी. धावणे हे तिन्ही क्रीडाप्रकार सलगपणे करणे असे या स्पर्धेचे स्वप्न होते. यासाठी 17 तासांचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. मात्र डॉ. गणपत्ये यांनी मागील वर्षी कझाकिस्तान येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेमध्ये नोंदवलेल्या वेळेपेक्षा 1 तास 25 मिनिटे कमी वेळ नोंदवत एकूण 13 तास 52 मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली.
या स्पर्धेसाठी हिंदी महासागरातील जिओग्रफी बे हा समुद्राचा भाग पोहण्यासाठी निवडण्यात आला होता. स्पर्धेदरम्यान सोसाटयाच्या वाऱ्यामुळे उंच लाटा उठत होत्या. त्याचे आव्हान पेलत डॉ. गणपत्ये यांनी हे अंतर 1 तास 43 मिनिटांमध्ये पूर्ण केले. सायकलिंगचा रस्ता त्यांनी 6 तास 45 मिनिटांमध्ये कापला. त्यानंतर सर्वात अवघड अशा 42 कि.मी. धावणे या प्रकारामध्ये डॉ. गणपत्ये यांनी हे अंतर 5 तासात पार केले. मागील वर्षी कझाकिस्तान येथे झालेल्या आयर्न मॅन स्पर्धेमध्ये नोंदवलेल्या वेळेपेक्षा 1 तास 25 मिनिटे कमी वेळ नोंदवत डॉ. गणपत्ये यांनी एकूण 13 तास 52 मिनिटांमध्ये ही स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेमध्ये एकूण 1352 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. त्यापैकी 1111 स्पर्धकांनी स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केली. भारतामधून सहभागी झालेल्या 38 स्पर्धाकांपैकी 29 स्पर्धक यशस्वी ठरले. सलग दुसऱ्या वर्षी फुल आयर्नमॅन हा किताब मिळवणाऱ्या डॉ. गणपत्ये यांचे चिपळूणमध्ये जोरदार स्वागत झाले. या यशाबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.