उमेदवारांना बोलावून त्यांच्या समोर करणार पडताळणी ; उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड
रत्नागिरी : नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत इलेक्ट्रीक व्होटिंग मशिन कामकाजावर दोन मतदारसंघातील उमेदवारांनी आक्षेप नोंदवले आहेत. या प्रकरणात मशिनची पडताळणी विहित कार्य पद्धतीनुसार रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येईल. त्यासाठी उत्पादक कंपनीतून दिवस निश्चित केले जातील अशी माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी दिली.
ते म्हणाले, विधानसभा निवडणूक 2024 मध्ये राजापूर आणि चिपळूण येथील उमेदवारांनी ईव्हीएम च्या कार्यपद्धतीबाबत आक्षेप नोंदवले आहेत. या यंत्रांची पडताळणी निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी यंत्रांच्या उत्पादक कंपनीकडून दिवस निश्चित केला जाईल त्या दिवशी सर्व उमेदवारांना निमंत्रित करून त्यांच्यासमोर पडताळणी कार्यक्रम पार पडेल.
ते पुढे म्हणाले, सर्व उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्यासमोर सुरुवातीला आक्षेप घेण्यात आलेल्या मतदान यंत्रांवरील सर्व माहिती म्हणजे डेटा काढून टाकण्यात येईल. यानंतर 1400 एवढÎा संख्येचा मॉकपोल म्हणजे प्रायोगिक मतदान येण्यात येईल. यामध्ये यंत्रात दर्शवली जाणारी मते आणि व्हीव्हीपॅट यांची पडताळणी होईल. जर दोन्ही आकडे जुळले तर प्रश्न नाही. परंतु काही कारणाने जुळले नाहीत तर अशा प्रसंगी निवडणूक आयोगाला अहवाल पाठवण्यात येईल. यानंतर पुढील कार्यवाहीविषयी निवडणूक आयोग सूचना देईल त्याप्रमाणे अंमलबजावणी होईल.