आहेरापेक्षा जीएसटी जास्त
खेड : तुळशी विवाहानंतर लग्नसराई हंगाम जोमात सुरू आहे. अलीकडे जेवणाच्या घासापासून सर्वच सेवांसाठी जीएसटी भरावा लागत आहे. त्यामुळे लग्नासह सर्वच समारंभांच्या खर्चात वाढ झाली असून, सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. जीएसटी लग्नकार्यातील खर्चाचा आकडा फुगवणारा ठरत आहे. त्यामुळे कार्यक्रमाला येण्याच्या आहेरापेक्षा शासनाला जाणारा जीएसटीचा आकडा तुलनेने मोठा होत आहे.
लग्नकार्य प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण. हा दिवस अविस्मरणीय करण्यासाठी प्रत्येक वर-वधू पक्षाचा कल असतो. थाटात लग्नकार्य करण्यासाठी प्रसंगी कर्ज काढून खर्च करण्याची तयारीदेखील मध्यमवर्गातील केली जाते. एका लग्न सोहळ्यासाठी साधारणपणे पाच ते दहा लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असतो.
या खर्चाची सुरुवात लग्नाचे कपडे खरेदीपासून सुरू होते. त्यानंतरच्या प्रत्येक खर्चावर कर भरावा लागतो. निमंत्रणपत्रिका, कार्यालय ते जेवणापर्यंत सर्वच गोष्टींना आता कर भरावा लागतो. काही ठिकाणी बिल एकत्रित करून जीएसटी दाखविली जात नाही. मात्र, वधू-वरांच्या खिशातून तो वसूल केलाच जातो. हौस पूर्ण करण्यासाठी रिसेप्शनचा पर्याय म्हणून काहीजण पाहुण्यांसाठी रिसेप्शन देतात. यामध्ये मोठ्या प्रमाणात खर्च होतो. रिसेप्शनसाठी कमीत कमी दोन लाखांपासून पुढे खर्च केला जात आहे. त्यासाठी अनेक सेवांवर जीएसटी भरावा लागतो.
लग्नकार्य करताना काही मंगल कार्यालय, डेकोरेशन, केटरर्स तसेच अन्य सेवा घेताना जीएसटी टाळण्यासाठी पक्के बिल देत नाहीत; मात्र वधू-वरांच्या पालकांकडून जीएसटीच्या नाव अतिरिक्त पैसे उकळले जात असल्याचेही अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे लग्नाच्या खर्च पेक्षा जीएसटी जास्त भरावा लागत असल्याने यजमानी हैराण झाला आहे.