रत्नागिरी : दिवाळीमध्ये बाजारपेठेला तेजी आली होती, मात्र निवडणुकीच्या काळात ती कमालीची मंदावली होती. किराणा बाजारातही मोठी उलाढाल न झाल्यामुळे काही वस्तूंच्या दरात घसरण झाली आहे. यामध्ये तेल, साखर, डाळ, साबुदाणा, शेंगदाणा यांचा समावेश आहे. या वस्तूंचे दर काही प्रमाणात कमी झाल्याने सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
श्रावणापासूनच किराणा मालाच्या दराला तेजी आली होती. खाद्यतेलाच्या पाठोपाठ किराणा मालाची दरवाढ सुरू होती. गणेशोत्सवामध्ये चणा डाळ, तेल, साखर व गुळाचे दरात वाढ झाली होती. पितृपंधरवड्यात दर ‘जैसे थे’ राहिले, मात्र नवरात्र सुरू होताच पुन्हा दरवाढ सुरू झाली. दसरा व त्यानंतर दिवाळीमध्ये खाद्यतेलासह डाळी, साखर, रवा, कडधान्यांच्या किमतीत वाढ झाली.
दिवाळीनंतर विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू होती. या काळात बाजारपेठेत फारशी उलाढाल न झाल्यामुळे किराणा मालाच्या दरात घसरण सुरू झाली. किलोमागे २ ते १० रुपयांची घट झाली असून ग्राहकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.