रत्नागिरी : जिंदल पोर्ट येथील एलपीजी गॅस प्लान्टमध्ये देखभाल दुरुस्तीचे काम सुरु असताना झालेल्या हलगर्जीपणामुळेच गॅस हवेत पसरुन विद्यार्थ्यांना त्रास झाला असून, याला जबाबदार चार जणांवर तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ठपका ठेवत जयगड पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
जयगड येथील पोर्ट भागात 12 डिसेंबर रोजी दुपारी 12.30 ते 13.45 या कालावधीत झालेल्या वायुगळतीमुळे नजीकच्याच माध्यमिक विद्यामंदिर जयगड आणि कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रास जाणवू लागला. हा वायु पसरल्याने परिसरात कुबटसा वास येत होता. शाळेतील मुख्याध्यापक वाघोदे यांनी तात्काळ कंपनीच्या अधिकारी आणि विद्यालय कमिटीला कळवून आपल्या सहकारी शिक्षकांच्या सहाय्याने जिंदलच्या कम्युनिटी हेल्थ सेंटरला प्राथमिक उपचारासाठी हलवले. या घटनेत 68 विद्यार्थी व एक महिलेवर उपचार करण्यात आले आहे.
याप्रकरणात करण्यात आलेल्या चौकशीत जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्ट विभागातील एलपीजी प्लान्टचे देखभालीचे काम सुरु होते. या एलपीजी कामावर नियंत्रण असणारे अधिकारी गंगाधर बंडोपाध्याय, भाविन पटेल व त्यांचे टिममधील अभियंते सिध्दार्थ कोरे व दीप विटलानी यांनी योग्य ती काळजी न घेतल्याने व त्यांच्या निष्काळजीपणामुळे वायु हवेत पसरल्याने या घटनेस हेच अधिकारी व अभियंते जबाबदार असल्याचे तक्रारीत म्हटले असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता 2023चे कलम 125, 286 प्रमाणे तक्रार दिली आहे.
तहसीलदारांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी जिंदल पोर्टच्या अधिकार्यांवर जयगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.