प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे पालकांचा निर्धार
शाळेच्या गेटवर मुलांना घेवून गजर करणार
राजन लाड / जैतापूर:-जि. प .शाळा जैतापूर नंबर 1 या सेमी इंग्रजी शाळेमध्ये एक पूर्णवेळ शिक्षक आणि एक सहाय्यक शिक्षक आवश्यक असताना गेल्या अनेक महिन्यांपासून केवळ एक कामगिरीवरील शिक्षक आणि तेही अदलुन बदलून कार्यरत असून प .सं .गटशिक्षणाधिकारी राजापूर यांच्याकडे वारंवार विनंती करून देखील या शाळेला शिक्षक मिळालेले नाहीत.
यासाठी पालक वर्ग तसेच जैतापूरचे सरपंच यांनी दोन ते तीन वेळा प्रत्यक्ष भेटून विनंती देखील केली होती. त्यावेळी चार-पाच दिवसात दोन शिक्षक देतो असे तोंडी सांगितले देखील होते. मात्र अद्याप पर्यंत या शाळेला दोन शिक्षक प्राप्त झालेले नाहीत.
कामगिरी वरील शिक्षकांमुळे तसेच वारंवार बदलून येणाऱ्या शिक्षकांमुळे आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने तसेच वारंवार विनंती करून देखील दुर्लक्ष करीत असल्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी आणि पालक सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 पासून शाळा बंद आंदोलन करणार असून पाल्यांना शाळेत न पाठवता शाळेच्या गेट बाहेर राहून शांततेच्या मार्गाने करणार असल्याचे निवेदन गटशिक्षणाधिकारी राजापूर यांना देण्यात आले असून त्याची प्रत माहितीसाठी सरपंच ग्रामपंचायत जैतापूर , गटविकास अधिकारी राजापूर,आमदार किरणजी सामंत याना देण्यात आले आहे .
पालकांनी आज सभा घेवून शाळा बंद आंदोलनाचा निर्धार केला असून आमच्या पाल्यांसह आम्हाला शाळेबाहेर राहून आंदोलन करावे लागू नये यासाठी आपण प्रयत्न करणार असाल तर सोमवार दिनांक 16 डिसेंबर 2024 पूर्वी आमच्या शाळेला दोन शिक्षक देण्याचे लेखी पत्र मिळाल्यास आम्ही शाळा बंद आंदोलनाचा फेरविचार करू असे म्हटले आहे. त्याबरोबर आपण आमच्या मागणीचा विचार न केल्यास होणाऱ्या आंदोलनास आणि आमच्या पाल्यांच्या नुकसानीस आपण जबाबदार असाल असेही कळविले आहे . आता प्रशासन याबाबत काय तोडगा काढते हे पाहावे लागणार आहे .