तुषार पाचलकर / राजापूर
कायदा आणि नियमांचे वारंवार उल्लंघन करून संस्थेचे कामकाज केले जात असल्याने राजापूर येथील आसरा प्लाझा गृहनिर्माण संस्थेवर सहकार खात्याने प्रशासक नेमण्याची कारवाई केली आहे. अशाप्रकारची ही प्रथमच कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.
सुमारे 12 वर्षांपूर्वी आसरा प्लाझा सहकारी गृहनिर्माण संस्था अस्तीत्वात आली. मात्र सभासदांनी द्यावयाच्या शुल्कची पोट नियमाप्रमाणे आकारणी होत नाही, पार्कींगची नियमावली केली नाही. नगर पालिकेने बेकायदेशीर ठरवलेले व त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने गाळयात पाणी घुसणे, सभासदांना कागदपत्र देत नाहीत, पाण्याचे पंपाचे बिल लाभधारकांकडून न घेता सेवा शुल्कात वीज भरणे, खोट्या सह्यानी संस्थेची नोंदणी होणे अशाप्रकारे अनेक तक्रारी संस्थेचे सभासद व ज्येष्ठ पत्रकार अनिल सिनकर यांनी संस्था व उपनिबंधक यांच्याकडे लेखी केल्या होत्या. पण त्याबाबत कोणीही दखल न घेतल्याने अखेर विभागीय निबंधक तक्रार दाखल केली. यानंतर जिल्हा उपनिबंधकांनी आदेश दिल्याप्रमाणे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 च्या कलम 78 (अ) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार अविनाश इंगळे, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था राजापूर या आदेशाने आसरा प्लाझा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या.राजापूर तालुका या संस्थेवर प्रकाश शांताराम मांगले यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.
प्राधिकृत अधिकारी यांनी तात्काळ संस्थेचे व्यवस्थापन हाती घेऊन कामकाज करावे तसेच या आदेशाच्या तारखेपासून तीन महिन्याचे आत नवीन समिती कायदेशिररित्या निवडून येण्यासाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या नियंत्रणाद्वारे कार्यवाही करावी व कामकाजाचा अहवाल सादर करावा असा आदेश 26 नोव्हेंबर 2024 रोजी निर्गमित केला आहे. या झालेल्या आदेशामुळे प्रशासक आता सभासदांना कशाप्रकारे न्याय देतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.