खून करूनही 5 दिवस शांतपणे आईशेजारी बसायचा
घरात दुर्गंधीने बापाने जाब विचारला तर सांगितलं ‘हे’ कारण
लखनऊ : उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक खळबळजनक घटना घडली होती. भाभा संशोधन संस्थेचे सहाय्यक शास्त्रज्ञ राममिलन यांच्या पत्नीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाला होता. राममिलन यांची पत्नी आपल्या अल्पवयीन मुलासोबत राहत होती. डोक्यात गंभीर जखम झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा संशय होता. आपली पत्नी फोन उचलत नसल्याने शास्त्रज्ञ राममिलन यांनी घराकडे धाव घेतली. त्यांनी घरात पाय ठेवताच त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांना आपली पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. यानंतर तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. पोलीस तपासातून या हत्येचे गूढ उकलले आहे.
अल्पवयीन मुलानेच आपल्या आईला मारुन टाकल्याचे पोलीस तपासातून समोर आले आहे. या संपूर्ण प्रकाराचे एकच कारण ते म्हणजे आईने मुलाला शाळेत जाण्यासाठी उठवले. रागाच्या भरात त्या मुलाने आपल्या आईला धक्काबुक्की केली आणि नंतर तिचे डोकं भिंतीवर आदळलं, ज्यात ती गंभीर जखमी झाली. एवढं सारं घडल्यानंतरही मुलाने तिला दवाखान्यात घेऊन न जाता तशाच स्थितीत सोडून शाळेत गेला होता. दरम्यान अतिरक्तस्रावामुळे आईचा जागीच मृत्यू झाला.
धक्कादायक म्हणजे आईच्या मृत्यूनंतरही तो मुलगा ५ दिवस आईच्या मृतदेहासोबत राहिला. ५ दिवस पत्नीशी न बोलल्याने शास्त्रज्ञ घरी पोहोचले तेव्हा दरवाजा उघडा होता आणि वास घरभर पसरला होता. आत गेल्यावर पत्नीचा मृतदेह जमिनीवर पडलेला पाहून राममिलन थक्क राहिले. मुलाकडे चौकशी केली असता त्याने वडील आणि पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. खाली पडल्याने आईचा मृत्यू झाल्याचे सांगितले, पण पोस्टमॉर्टम मधून हत्येचे गूढ उकलले. आईचा मृत्यू ६ दिवसांपूर्वीच झाल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी मुलाकडे कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे.
पिपराइच भागात वास्तव्यास असणारे भाभा रिसर्च इन्स्टिट्यूटचे शास्त्रज्ञ राममिलन यांनी आपल्या मुलाला शहरातील एका नामवंत शाळेत प्रवेश मिळवून दिला होता. पण शाळेच्या नावाने तो हुल्लडबाजी करू लागला. मुलाच्या या कृत्याने त्रस्त झालेली त्याची आई आरती १ डिसेंबरला शाळेत पोहोचली आणि तेथील मुख्याध्यापकांकडे मुलाबाबत तक्रार केली. मुख्याध्यापकांनी सर्वांसमोर मुलाला खडसावले होते. या गोष्टीची सल त्याच्या मनात होती
यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही आरोपी मुलाची दोन तास कसून चौकशी केली. त्यानंतर त्याने आपला गुन्हा स्वीकारला. तब्बल दोन तासांनंतर त्याने घटनेबद्दल सांगितले. रागाच्या भरात वाद पेटला आणि त्याने आपल्या आईचे डोके भिंतीवर आदळले, त्यानंतर तिचा मृत्यू झाला. शास्त्रज्ञ राम मिलन यांनी आपल्या मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. यानंतर आम्ही अल्पवयीन मुलाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.