रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा येत्या रविवारी (ता. १५) दुपारी ३ वाजता शेरे नाका येथे संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात आयोजित केला आहे. यावेळी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांचे सर्वोत्तमाचा ध्यास या विषयावर व्याख्यान होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष माधव हिर्लेकर व उपाध्यक्ष मिलिंद आठल्ये यांनी केले आहे.
ज्येष्ठ पत्रकार, माजी संपादक उदय निरगुडकर यांना पुणे विद्यापीठाने `मार्केटिंग मॅनेजमेंट’ या विषयात डॉक्टरेट ही पदवी प्रदान केली. दोन दशकांहून अधिक काळ आय.टी., शैक्षणिक क्षेत्र, पायाभूत सुविधा, पत्रकारिता आणि आर्थिक क्षेत्रात कामाचा दांडगा अनुभव. अग्रगण्य आयटी कंपनीत आंतरराष्ट्रीय पातळ्यांवर प्रमुख पदावर काम केले आहे. ५० हून अधिक देशांत शैक्षणिक क्षेत्र, अर्थव्यवस्था आणि व्यवस्थापनकौशल्य यांतील विविध विषयांवर व्याख्याने दिली आहेत. विविध विषयांवर पुस्तकांचे संकलन केले आहे. झी २४ तास, न्यूज१८ लोकमत या वृत्तवाहिन्यांचे व डीएनए या दैनिकाचे मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सध्या देश-विदेशातील विद्यापीठे, संशोधन संस्थांमध्ये कार्यरत आहेत. सर्वोत्तमाचा ध्यास या विषयावर ते व्याख्यान देणार आहेत.
या कार्यक्रमात विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. यामध्ये राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार आर्या मदन डोर्लेकर, धन्वंतरी पुरस्कार डॉ. सौ. छाया अरुण जोशी (राजापूर), आदर्श पौरोहित्य पुरस्कार वे. मू. श्रीकृष्ण जगन्नाथ पाध्ये (लांजा), आदर्श कीर्तनकार पुरस्कार हभप रोहन भालचंद्र पुराणिक (वेंगुर्ला), आचार्य नारळकर पुरस्कार सौ. रुचा राकेश हर्डीकर (आडिवरे, राजापूर), कृषी संजीवन पुरस्कार प्रसाद पुरुषोत्तम पाध्ये (पाथर्डी, चिपळूण) यांना प्रदान करण्यात येणार आहे. उद्योगिनी पुरस्कार सौ. सई सुरेंद्र ठाकुरदेसाई (गोळप, रत्नागिरी) आणि उद्योजक पुरस्कार वरद गोपाळ खांडेकर (बुरंबाड, संगमेश्वर) यांना देऊन गौरवण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी पितांबरी उद्योग समूहाचे सहकार्य लाभले आहे. जास्तीत जास्त कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे सभासद, ज्ञातीबांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.