दापोली : तालुक्यातील नवशी येथून संतोष तुकाराम माटल हे 48 वर्षीय प्रौढ बेपत्ता झाल्याची घटना 25 जुलै रोजी घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माटल हे नवशी येथे एकटेच राहत होते. त्यांना दारू पिण्याचे व्यसन होते. ते भंगार गोळा करून उदरनिर्वाह चालवत होते. भंगार गोळा करण्यासाठी ते 3 ते 4 दिवस बाहेर जात असत व पुन्हा घरी येत असत. 25 जुलै रोजी दुपारी 2ः30 वाजण्याच्या सुमारास शिरशिंगे ग्रामपंचायत समोरून संतोष माटल यांना वाकवलीकडे जाताना काही ग्रामस्थांनी पाहिले होते. त्यानंतर अद्यापपर्यंत ते घरी पोहोचलेले नाहीत. त्यांच्या नातेवाईकांकडे चौकशी केली असता ते कोठेही आढळून आले नाहीत. यामुळे दापोली पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. सदर व्यक्ती आढळून आल्यास दापोली पोलीस स्थानकाशी संपर्क करावा, असे आवाहन पोलीस स्थानकाकडून करण्यात आले आहे. अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र नलावडे करीत आहेत.