25 हजारांचा जामीन मंजूर
रत्नागिरी : राजापूर तालुक्यातील अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत तिच्याशी शरिरसंबंध ठेवल्याचा आरोप असलेल्या संशयिताची न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जामीनावर मुक्तता केली. प्रेमकुमार सुनील पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 363, 376 व पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच राजापूर पोलिसांकडून प्रेमकुमार याला सांगोला येथून अटक करण्यात आली होती.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अनिलकुमार अंबाळकर यांनी जामीन अर्जावर निकाल दिला. आरोपीच्यावतीने लोकअभिरक्षक कार्यालयाचे उपमुख्य लोकअभिरक्षक ऍड़ उन्मेश मुळये यांनी युक्तीवाद केला. गुन्ह्यातील माहितीनुसार आरोपी याने पिडीत मुलीशी ओळख निर्माण करुन तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 26 जून 2024 रोजी पिडीता ही सकाळी महाविद्यालयात जाते असे सांगून घरातून बाहेर पडली होती. यानंतर ती सायंकाळपर्यंत घरी परतली नाही. यामुळे चिंतेत पडलेल्या पालकांनी मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार राजापूर पोलीस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फुस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल करत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलिसांच्या तपासामध्ये पिडीता ही आपल्या आजीचा मोबाईल वापरत असल्याचे समोर आले. पोलिसांनी या मोबाईलच्या सीडीआर तपासणी केली असता पिडीता ही सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे असल्याचे निष्पन्न झाले. याठिकाणी पोलिसांनी शोध घेतला असता पिडीता संशयित आरोपी याच्यासोबत वास्तव्य करत असल्याचे आढळून आले. पोलिसांकडून दोघांनाही ताब्यात घेवून राजापूर येथे आणण्यात आले. आरोपी याने आपल्याशी शरिरसंबंध प्रस्थापित केल्याचे पिडीतेने पोलीस व दक्षता समिती सदस्य यांच्यापुढे दिलेल्या जबाबामध्ये उघड केले.
याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी याच्याविरुद्ध भादंवि कलम 363,376 व बालकांचे लैगिक अपराधांपासुन संरक्षण अधिनियम 2012 (पॉक्सो) नुसार गुन्हा दाखल केला तसेच अटक करुन न्यायालयापुढे हजर केल़े. मागील काही महिन्यांपासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी याने जामीनासाठी न्यायालयापुढे अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याची 25 हजार रुपयांचा सशर्त जामीन मंजूर केला.