चिपळुणातील वंचितच्या आजच्या मोर्चा बाबत संघटनांनी केले पुन्हा जनतेला आवाहन
चिपळूण : वंचितचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अण्णा जाधव यांनी जाहीर केलेल्या 12 डिसेंबर रोजीच्या मोर्चाला प्रशासनाने परवानगी दिलेली नाही. तसेच जिल्हा प्रशासनाने 20 पर्यंत जमावबंदी आदेश जारी केला आहे. अशा परिस्थितीत मोर्चात सहभागी झाल्यास गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सामाजिक संघटना कोणालाही सहकार्य करणार नाही. त्यामुळे या मोर्चात कोणीही सहभागी होऊ नये, असे आवाहन येथील सामाजिक संघटनांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
या पत्रकात म्हटले आहे की, जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्यातील संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे काही दिवसात तपास पूर्ण होऊन सत्य समोर येणार आहे. असे असताना अण्णा जाधव आंदोलन करण्यावर ठाम आहेत. तर प्रशासनाने त्यांच्या मोर्चाला परवानगी नाकारली असून जिल्हा प्रशासनाने 20 पर्यंत जमाव बंदी आदेश जारी केला आहे. असे असताना जाधव हे लोकांना मोर्चात सहभागी होण्यासाठी भावनिक आवाहन करीत आहेत. त्यांच्या या आवाहनाला कोणीही बळी पडून मोर्चात सहभागी होऊ नये, अन्यथा आंदोलकांवर कायदेशीर कारवाई होऊन अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वी तालुक्यातील सलोखा कायम रहावा आणि जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून सामाजिक संघटनांनी बौद्ध समाज बांधवांना मोर्चात सहभागी होऊ नये, असे आवाहन केले. मात्र जाधव यांनी टक्केवारी घेणारे व दलाली करणारे असा खोटा व खोडसाळ आरोप सामाजिक संस्था व राजकीय कार्यकर्त्यांवर केला. मात्र खरा दलाल कोण याचे उत्तर येणारा काळ देईल. जाधव यांनी केलेल्या आरोपाचे खंडन करण्यासह त्यांचे खरे पाप लोकांसमोर मांडण्यासाठी लवकरच मेळावा घेतला जाणार आहे. तरी तालुक्यातील जनतेने या मोर्चात सहभागी होवू नये अन्यथा पुढील कायदेशीर कारवाईमध्ये समाजाचे सहकार्य मिळणार नाही असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. या पत्रकावर तालुका बौद्धजन हित सरंक्षण समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रकात सावंत, भारतीय बौद्ध महासभो अध्यक्ष जयरत्न कदम, बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष संदेश मोहिते यांच्या आंदोलनाच्या सह्या आहेत.