रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाचे काम गेली चौदा वर्षे चालू आहे. त्यातच महामार्गाला मोठे खड्डे पडले आहेत. मंगळवार सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीहून खेडला जाणारी बस निवळी घाटात आली असता रस्त्याला पडलेल्या मोठया खड्डयात चाक गेल्याने भरधाव बस खड्डयात जोरदार आदळली. यामध्ये अनेक प्रवाशांना मुकामार लागला, तर एका महिलेला रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावे लागले.
मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीतून खेडला जाण्यासाठी एसटी बस सुटली. प्रवासी घेऊन बस निवळी घाटात आली असता रस्त्याला पडलेल्या मोठया खड्डयामध्ये भरधाव गाडीचे चाक गेले. यामुळे बसला जोराचा दणका मिळाला. त्यामुळे प्रवाशांनाही दणका मिळाल़ा अनेक प्रवासी मुक्यामाराने ग्रस्त झाले. एका महिलेला संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात धाव घ्यावी लागली.
रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता एसटी बस चालक घाटासारख्या जोखमीच्या मार्गावर जबर वेगाने गाडी चालवत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत़. रत्नागिरी-चिपळूण या खराब रस्त्यावर अधिक काळजीपूर्वक वाहन चालवणे अपेक्षित असताना वाहन चालक अविचाराने व हयगयीने वाहन चालवत असल्याने प्रवाशांना मुकामार सोसण्याची वेळ येत आह़े. या प्रकाराची गंभीर दखल ऱा प़ महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घ्यावी अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आह़े.