भाजप-शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता
मुंबई:-मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होऊन आठवडा होत आला तरी पुढील मंत्रिमंडळ विस्तार कधी याकडे साऱ्या राजकीय पक्षांसह जनतेचे लक्ष लागले आहे.
शिवसेना आणि भाजपमध्ये काही मंत्रिपदांच्या तिढ्यामुळे विस्तार रखडला होता. 14 डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त जवळपास निश्चित मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याचे समजते. या बैठकीअंती शिवसेनेला नगरविकास खाते मिळण्याची शक्यता आहे. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार होते. मात्र, काही कारणामुळे त्यांना या बैठकीला जाता आले नाही. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी फडणवीस यांना फोन लावून त्यांचे आणि शिंदे यांचे बोलणे करुन दिले. यावेळी मंत्रिमंडळातील महत्त्वाच्या खात्यांबाबत चर्चा झाल्याचे समजते.
ठाण्यातील या बैठकीनंतर शिवसेनेला उपमुख्यमंत्री पदाव्यतिरिक्त 12 मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे मंत्रिपदांसाठी बरेच दिवस नाराजी नाट्य सुरू आहे. याचा फायदा त्यांना झाल्याचे दिसत आहे. कारण शिंदे गटाच्या वाट्याला 13 ते 14 मंत्रीपदं येण्याची शक्यता आहे. आता शिवसेनेसोबत चर्चा झाल्यानंतर फडणवीस हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत चर्चा करतील. भाजप-राष्ट्रवादीच्या मंत्रिमंडळासंदर्भातील चर्चेची एक फेरी दिल्लीत पार पडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे आगामी एक-दोन दिवसांत खातेवाटपही निश्चित होईल, असे सांगितले जात आहे.
विधानसभेचे तीन दिवसीय अधिवेशन झाले. त्यानंतर आता सगळ्यांना मंत्रिमंडळ विस्ताराची उत्सुकता लागली आहे. मंत्रिपदांबाबत कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने आमदारांचं टेन्शन वाढले आहे. अब्दुल सत्तारांच्या नावाला भाजप आमदारांसह शिवसेना आमदारांचाही विरोध असल्याचे सांगितले जात आहे. एकीकडे शिवसेनेचे मंत्री टेन्शनमध्ये असताना दुसरीकडे भाजपच्या आमदारांची अवस्थाही वेगळी नाही. दिल्लीतल्या यादीची भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना प्रतीक्षा लागून राहिली आहे. काही खात्यांबाबत महायुतीत समन्वय होत नसल्याने भाजपचीही यादी लटकल्याचे सांगितले जात आहे. दिल्लीतून अद्याप भाजपच्या संभाव्य मंत्र्यांना विचारणा झाली नसल्याची सूत्रांची माहिती. पुढच्या 48 तासात तरी दिल्लीत काही हालचाली घडणार की, आणखी वेळ लागणार याकडे संभाव्य मंत्र्यांचे लक्ष लागले आहे. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला उशीर होत असल्याने भाजपाच्या संभाव्य मंत्र्यांचेही टेन्शन वाढले आहे.