रत्नागिरी:-येथील क्षत्रिय मराठा मंडळाने टीआरपी येथील अंबर हॉलमध्ये आयोजित मराठा सप्तपदी वधू-वर मेळाव्याला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मेळाव्यात नवीन वधू-वर नोंदणी झाली.
मेळाव्याची सुरुवात मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सतीशराव साळवी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी मंडळाच्या उपाध्यक्ष श्रीमती प्राची शिंदे, एमबीएफ रत्नागिरी चॅप्टर अध्यक्ष समीर इंदुलकर, आशा साळवी, प्रमोद निकम, संतोष तावडे आदी मान्यवर उपस्थित होते. संतोष तावडे यांनी वधू-वर व पालकांना मार्गदर्शन केले. विवाह जमण्याच्या दृष्टीने सद्यःस्थितीतील अनुभव, अडचणींवर मात करून तडजोडीने विचार करून विवाह जमवण्याच्या दृष्टीने पुढे पावले टाकावीत, असे त्यांनी सांगितले.
स्वतःचा उत्तम परिचय करून देणाऱ्या वधू-वरांना बक्षीस जाहीर करण्यात आले. त्याप्रमाणे वधू डॉ. सिद्धी चाळके व वर सौरभ माने यांची निवड करण्यात आली. त्यांना बक्षीस देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकार डान्स अॅकॅडमीचे संचालक अमित कदम यांनी केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात हा वधू-वर मेळावा पार पडला.