महिन्याला ७ हजार रुपये देणाऱ्या खास स्कीमच्या अटी आणि नियम काय आहेत?
केंद्र सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबानासाठी विमा सखी योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळू शकणार आहे. तसंच महिन्याला ७ हजार रुपयेही मिळू शकतात अशी ही योजना आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ही योजना आणण्यात आली आहे. ही योजना नेमकी काय आहे आपण जाणून घेणार आहोत.
विमा सखी योजना नेमकी काय आहे?
विमा सखी योजना ही एलआयसीची ( LIC ) एक खास योजना आहे. या योजनेसाठी महिलाच अर्ज करु शकतात. या योजनेच्या अंतर्ग महिलांना तीन वर्षांसाठी स्टायपेंड मिळणार आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना एकूण तीन वर्षांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या कालावधीत महिला एलआयसी ( LIC ) एजंट म्हणून काम करु शकणार आहेत. ज्या महिलांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे अशा महिलांना एलआयसीमध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर म्हणूनही काम करता येणार आहे.
विमा सखी योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या अटी काय आहेत?
महिलांना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांचं १० वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं असलं पाहिजे
तसंच या योजनेसाठी महिलेचं वय कमीत कमी १७ आणि जास्त ७० वर्षे असणं आवश्यक आहे.
तीन वर्षांचं प्रशिक्षण घ्यावं लागेल, त्यानंतर या महिलांना विमा एजंट म्हणून काम करता येईल.
विमा सखी योजनेत किती पैसे दिले जातील?
प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना स्टायपेंड दिलं जाणार आहे. पहिल्या वर्षी प्रति महिना सात हजार रुपये, दुसऱ्या वर्षी प्रति महिना ६ हजार रुपये तर तिसऱ्या वर्षी ५ हजार रुपये दिले जातील. यामध्ये कमिशनचा समावेश नसेल. कमिशनच्या रुपात मिळणारे पैसे वेगळे असतील. दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी मिळणारं ६ हजार आणि ५ हजार मिळण्यासाठी एक अट ठेवण्यात आली आहे. पहिल्या वर्षी ज्या पॉलिसी काढून दिल्या आहेत त्यातल्या ६५ टक्के योजना दुसऱ्या वर्षीही सुरु असल्या पाहिजेत.
एलआयसी बिमा सखी योजनेसाठी कोण अर्ज करु शकणार?
विमा सखी योजनेसाठी ज्या महिलांना अर्ज करायचा आहे त्यांच्यापैकी कुणीही एलआयसी ( LIC ) कर्मचारी असता कामा नये. तसंच त्यांच्या नात्यातही कुणी एलआयसी कर्मचारी असता कामा नये. ज्या महिलांना या योजनेच्या अंतर्गत काम मिळेल त्या महिला एलआयसीच्या नियमित कर्मचारी नसतील.
एलआयसी विमा सखी योजनेसाठी अर्ज कसा कराल?
एलआयसी ( LIC ) विमा सखी योजनेसाठी एलआयसीच्या अधिकृत https://licindia.in/test2 या वेबसाईटवर जा. या ठिकाणी विमा सखी योजनेवर लिंकवर क्लिक करा. त्यात तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी आणि पत्ता पोस्ट करा. त्यानंतर कॅप्चा कोड एंटर करुन अर्ज सबमिट करा. १० वी पास झाल्याचं प्रमाणपत्र, पत्त्यासाठीचा पुरावा, वयाचा पुरावा ही कागदपत्रं आवश्यक आहेत.