चिपळूण:-येथील राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे चिपळूण शहरासह तालुक्यात ईव्हीएम मशीनविरोधात सह्यांची मोहीम राबवली जाणार आहे. मंगळवारी काँग्रेस संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनमध्ये घोळ असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. ईव्हीएम मशीन हटवून सर्व प्रकारच्या निवडणुका या बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे. त्या अनुषंगाने ईव्हीएम मशीन हटवण्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व जिल्हा प्रभारी मिनेष राऊत यांच्या आदेशानुसार राज्यात सह्यांची मोहीम राबवण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूण काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती.
ईव्हीएमविरोधात शहरीसह व ग्रामीण भागातील लोकांपर्यंत जाऊन सह्यांची मोहीम राबवण्याचे ठरवण्यात आले. बैठकीला तालुकाध्यक्ष लियाकत शाह, शहराध्यक्ष संतोष सावंत-देसाई, जिल्हा उपाध्यक्ष सुरेश राऊत, अ. ल. माळी, सेवादल तालुकाध्यक्ष इम्तियाज कडू, सेवादल जिल्हाध्यक्ष तुळशीराम पवार, माजी नगरसेवक कबीर काद्री आदी उपस्थित होते.