संगमेश्वर:- संगमेश्वर तालुक्यातील माखजन बसस्थानकाचे स्वरूप आता पूर्णपणे बदलणार आहे.
बसस्थानक परिसरातील खराब झालेले आवार, खड्डे आणि चिखलाच्या समस्यांमुळे प्रवासी, ग्रामस्थ आणि एसटी कर्मचाऱ्यांना होणारा त्रास अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. आमदार निकम यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या फंडातून एक कोटीचा निधी मंजूर केला आहे.
माखजन येथील बसस्थानकाची बिकट अवस्था झाली होती. त्यामुळे माखजन ग्रामस्थांनी ही समस्या आमदार शेखर निकम यांच्यापर्यंत पोहोचवली. त्यानुसार आमदार निकम यांनी पाठपुरावा केला. सामंत यांनी कामाची दखल घेत एमआयडीसीच्या फंडातून एक कोटीचा निधी मंजूर केला. त्यानुसार या निधीतून बसस्थानकाचे सुशोभीकरण सुरू झाले आहे. बसस्थानक परिसरात दर्जेदार दुरुस्ती आणि आधुनिक सुविधांची उभारणी केली जात आहे. यामुळे स्थानकाचा कायापालट होणार आहे.