मुंबई:- एसटीला दरमहा 850ते 900 कोटी रुपये महसूल मिळतो; परंतु यंदा दिवाळीमुळे एसटीच्या तिजोरीत एक हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झालेला आहे. पण तरीही एसटी कर्मचारी अजूनही वेतनाच्या प्रतीक्षेत आहेत.
एक हजार कोटी रुपये इतका चांगला महसूल मिळालेला आहे; पण तरीही एसटी कर्मचा-यांना अद्याप वेतनाची प्रतीक्षा करावी लागत आहे.
एसटी कर्मचा-यांना किमान सात तारीखपर्यंत वेतन मिळणे आवश्यक आहे. पण नेहमी दहा तारखेला कधीच वेतन मिळत नाही. पगाराची तारीख दर महिन्याला उलटून जाते. या महिन्याची दहा तारीखही उलटून गेली आहे, पण पगार हातात आलेला नाही. पगाराची तारीख उलटून गेल्यावर कर्मचारी आरडाओरडा करतात, मग पगार होतो. हे गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचा एसटी कर्मचा-यांचा अनुभव आहे.
एसटीचे प्रवासी, महिला,ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी, स्वातंत्र्यसैनिक अशा विविध घटकांना प्रवासी भाडय़ात सवलत मिळते. 700 कोटी रुपये इतकी सवलत मूल्य प्रतिपूर्ती रक्कम एसटीला सरकारकडून मिळावी असा प्रस्ताव एसटीने गेल्या काही दिवसांपूर्वी पाठवला आहे. शपथविधी सोहळा, विधिमंडळ अधिवेशन, मंत्रिमंडळ विस्तारामुळे निर्माण झालेला महायुतीतील पेच यामुळे प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी महायुती सरकारला वेळ मिळत नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने विविध योजना-सवलती समाजातील विविध घटकांना दिल्या; पण सणवार, ऊन-वारा आणि पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिन प्रवाशांची वाहतूक करणा-या एसटी कर्मचाऱयांचा सरकारला विसर पडला आहे हे दुर्दैवी असून, एसटी कर्मचाऱयांबाबत सरकारचा दृष्टिकोन नेहमी दुटप्पी राहिला आहे. राज्य सरकारकडून सावत्र भावाची वागणूक मिळत असल्याची भावना कर्मचाऱयांमध्ये निर्माण झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाले. सरकारही स्थापन झाले, पण निवडणुकीनंतर सरकारला एसटी कर्मचा-यांचा लगेच विसर पडल्याची टीका महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे.