रत्नागिरी, रायगडमधील खारवी समाजाचा 18 ला जनआक्रोश मोर्चा
मुंबई : मच्छीमार बोटीवरील तांडेल रवींद्र काशीराम नाटेकर यांच्यावर भ्याड हल्ला करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमाला लवकरत लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी, या मागणीसाठी अखंड खारवी समाज रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांतील खारवी समाज समितीतर्फे १८ डिसेंबरला सकाळी १० वा. तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
२० ऑक्टोबर २०२४ ला साखरीआगर येथील मच्छीमार रवींद्र काशिराम नाटेकर यांच्यावर मासेमारी करताना जयप्रकाश विश्वकर्माने सुरीने तांडेल रवींद्र नाटेकर यांच्यावर हल्ला करून त्याचा खून केला होता, तसेच बोट पेटवून दिली होती. अतिशय घृणास्पद, मानवी जातीला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करून नराधमाला लवकरत लवकर मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी तसेच संबंधित घटनेचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात यावा. या घटनेचा निःपक्षपातीपणे पोलिस तपास व्हावा, अशी मागणी या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे. खारवी समाज समिती गुहागरचे अध्यक्ष महेश नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली हा मूकमोर्चा काढण्यात येणार आहे.