महिन्याला जमा होतेय ३ टन कंपोस्ट खत, प्रतिदिनी जमा होतोय ३ टन कचरा
सचिन मोहिते / देवरुख
देवरुख नगरपंचायतीच्या वतीने कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकरिता घनकचरा व्यवस्थापन करण्यात आले आहे. शहरानजीक कांजीवरा प्रभात नगर येथे नगरपंचायतीच्या काही कोटींच्या स्वमालकीच्या जागेमध्ये सुमारे ७० लाख रुपये खर्चून इमारती सहित मशनरी बसवण्यात आल्या आहेत या ठिकाणी महिन्याला तीन टन कंपोस्ट खत निर्माण केले जात आहे. त्यामुळे आता यापूर्वी देवरुख नगरपंचायतीला भेडसावणारी कचऱ्याचे समस्या आता संपुष्टात आली आहे.
देवरुख नगरपंचायतीचा कचरा, यापूर्वी परशुराम वाडी येथील कावळटेक येथे हा कचरा एका डोंगराळ भागात जमा केला जात होता. कालांतराने स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नगरपंचायतीने सुमारे सहा कोटी रुपयांची ३१४ गुंठे जागा कांजिवरा प्रभात नगर येथे खरेदी केली. आणि या ठिकाणाहूनच कचरा व्यवस्थापनाला सुरुवात झाली. येथे कचऱ्यावर व्यवस्थापन करण्याकरिता ४२ लाख ५० हजार रुपयांची इमारत उभी करण्यात आली. या इमारतीमध्ये कंपोस्ट खत तयार करणारा प्रकल्प राबविण्याकरिता २८ लाख ५० हजार रुपयांची मशनरी खरेदी करण्यात आली. आणि गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी कंपोस्ट खताची निर्मिती होऊ लागली आहे.
देवरुख शहरात प्रतिदिनी अडीच ते तीन टन ओला व सुका कचरा जमा केला जातो. हा कचरा जमा करण्याकरिता तीन घंटा गाड्या व एक ट्रॅक्टरचा वापर केला जातो. या गाड्यांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांचा कचरा गोळा करण्यात येतो हा कचरा दोन टप्प्यांमध्ये वेगवेगळा केला जातो. या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करुन कंपोस्ट खताची निर्मिती सध्या सुरु आहे. प्रति महिना ३ टन खताची निर्मिती करण्यात येते. या खताला हरित ब्रँड मिळावा याकरिता राहुरी येथे तपासणी करुन घेण्यात आली. हि तपासणी सकारात्मक आली आहे. याबरोबरच आवश्यक ती प्रक्रिया देखील स्वच्छ भारत मिशनकडे करण्यात आली असल्याची माहिती नगरपंचायत प्रशासनाकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या कंपोस्ट खताला लवकरच हरित ब्रँड मिळणार आहे.
तर दुसरीकडे सुका कचऱ्यातील जमा होणारा पुठ्ठा आणि प्लास्टिक वेगळे करून हा कचरा पुणे येथील एक संस्था घेत आहे तशा प्रकारचा करार या संस्थेकडे करण्यात आला आहे. तर मच्छी मार्केट मधील कचरा एकत्रित जमा व्हावा याकरिता हॉपर्स देखील तयार करण्यात आले आहे. दररोज फिरुन कचरा जमा करणार्या घंटागाड्या, आठवडा बाजारानंतर सायंकाळी जमा केला जाणारा कचरा एकूणच देवरुख नगरपंचायत कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुयोग्य पद्धतीने राबवीत असल्याचे स्पष्ट होत आहे या कामी नगरपंचायतीचे प्रशासन आणि कर्मचारी वृंदांचे देखील तितकेच सहकार्य लाभत आहे.