भारत भ्रमण करून गावी आलेल्या दांपत्याचे नागरिकांनी केले जंगी स्वागत
मंडणगड : दुचाकीवरुन 79 दिवस व 15 हजार किलोमीटर इतके अंतर कापून भारत भ्रमण पूर्ण केलेले मंडणगडातील वर्षा डंबे व सम्राट डंबे हे दांपत्य रविवारी म्हाप्रळ या मूळ गावी परतले. यावेळी गावातील दुचाकीस्वारांनी रॅली काढून दोघांचे जंगी स्वागत करत त्यांचा जाहीर सत्कार केला.
सम्राट आणि वर्षा यांची आर्ट इंडिया राईड हा साहस, देशभक्ती आणि सांस्कृतिक शोधाची भावना व्यक्त करणारा एक अविश्वसनीय प्रवास ठरला. या दोघांनीही आपल्या प्रवासाचे वर्णन केले व उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आम्ही भारत भ्रमण करीत असल्याचे कळल्यावर देशातील कानाकोपऱ्यातून मिळालेल्या आदरामुळे आम्ही भारावून गेल्याचे दोघांनी यावेळी सांगितले.
20 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झालेला आणि 8 डिसेंबरला संपलेला हा प्रवास सम्राट आणि वर्षाला भारताच्या वैविध्यपूर्ण निसर्गचित्रे, संस्कृती आणि सीमावर्ती प्रदेशातून घेऊन गेला. त्यांच्या राईडने केवळ देशाचे नैसर्गिक सौंदर्यच दाखवले नाही तर तेथील लोकांची लवचिकता व उबदारपणाही ठळक केला आहे. 15,000 कि.मी.चा आर्ट इंडिया राईडचा प्रवास पूर्ण करत ते सर्वांच्या कौतुकास पात्र ठरले.
स्वागत कार्यक्रमास डॉ. उल्हास डंबे, डॉ. प्रभाकर भावठाणकर, डॉ. दाभाडकर, डॉ. आशिष जाधव, डॉ. पराग वैशंपायन, डॉ. सुहास पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष मुझफ्फर मुकदाम, काँग्रेसचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष समंद मांडलेकर, मनसेचे मुश्तकिम कारविणकर, अहमद मुकादम, निखील पिंपळे, डंबे कुटुंबिय व म्हाप्रळ येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी विविध सामाजिक संस्था, संघटनांच्यावतीने डंबे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला.