दापोली : शहरातील बसस्थानकासमोर अपघातग्रस्त झालेल्या व जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या वृद्ध महिलेला वेळीच दवाखान्यात दाखल करून दापोलीतील शालेय मुलींनी प्रसंगावधान राखले व सामाजिक जाणीवेचे दर्शन घडविले. या शालेय विद्यार्थिनींचे परिसरातून कौतुक होत आहे.
शहरातील बसस्थानकासमोर एक वृद्ध महिला दुचाकीवरून रस्त्यावर पडली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्त वाहत होते. या प्रकारामुळे दुचाकीस्वार भांबावून गेला आणि तो काही करण्याच्या मनःस्थितीत नव्हता. अखेर तिथून घरी जाणाऱ्या दापोली शहरातील लोकमान्य हायस्कूलच्या विद्यार्थिनी आदिती नाचरे, रुबी अबगुल, मनस्वी अबगुल, सानिका नामोळे, किमया • कदम यांनी या महिलेला पाहिले. त्यांनी प्रसंगावधान राखत त्या महिलेच्या जवळ जाऊन तिला रिक्षात बसवून उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यामुळे या वृद्ध महिलेचा जीव वाचला.
मुलींनी दाखवलेल्या धाडसाबद्दल लोकमान्य सेवाभावी प्रतिष्ठान कऱ्हाड, दापोलीचे कार्याध्यक्ष धनंजय खोत, शालेय समिती अध्यक्ष वर्धमान खोत, मुख्याध्यापिका के. डी. राऊत, सर्व शिक्षक व दापोलीतील प्रसिद्ध आर्किटेक्चर दर्शन राऊत यांनी त्यांना भेटवस्तू देऊन त्यांचे कौतुक केले.