रत्नागिरी : प्रेमप्रकरण, जमीन वादातून रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभरात 9 खून झाल्याचे समोर आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खुनाच्या घटना इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कमी असल्या, तरी ज्या घटना घडल्या आहेत, त्यामुळे जिल्हा या घटनांनी हादरला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२४ या ११ महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यात ९ खून झाले आहेत, तर ११ जणांच्या खुनाचा प्रयत्न झाला आहे. मात्र, या घटनांमुळे पोलिस यंत्रणेला सतत ‘अॅक्शन मोड’वर रहावे लागत आहे.
रत्नागिरी जिल्हा शांत जिल्हा म्हणून आतापर्यंत ओळखला जात होता. परंतु, आता खुनाच्या घटना घडू लागल्याने पोलिस यंत्रणेलाही यामुळे धक्का बसू लागला आहे. कोकण रेल्वेमुळे जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. तसेच, विविध उद्योग- व्यवसायासाठीही जिल्ह्यात लोक येत आहे. या वर्षभरातील खुनांच्या गुन्ह्यांची कारणे पाहता प्रामुख्याने घरगुती कारणांमुळे, दागिन्यांच्या हव्यासापोटी, जमिनीच्या वादातून, तर काही वेळा प्रेमप्रकरणातून खून करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
घरगुती, प्रेमप्रकरण, जमीन वादातून खून
रत्नागिरी जिल्ह्यात झालेले खून हे घरगुती वाद जमिनीचे वाद यामुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे मात्र बाहेरून आलेल्यांनी खून केल्याचा प्रकार जिल्ह्यात घडलेला नाही.
-धनंजय कुलकर्णी
जिल्हा पोलीस अधीक्षक, रत्नागिरी