सातत्याने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमाची व त्यातील परिणामकारकतेची दखल
खंडाळा : संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या अभियानात रत्नागिरी तालुक्यातील अत्यंत ग्रामीण भागात असलेल्या जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेची निवड होऊन तालुकास्तरावर या शाळेने तृतीय क्रमांक पटकावला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा दोन हे अभियान सुरू होते. शाळेने भौतिक सुविधा विकासासह, विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी केलेले प्रयत्न आणि त्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी घेतलेला पुढाकार या बाबींवर आधारित गुणांकन करण्यात येते. त्यातून सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शाळांची निवड करण्यात येते. त्यानुसार जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी शाळेची पायाभूत सुविधा, शासन ध्येय धोरणांची अंमलबजावणी आणि शैक्षणिक संपादणूक या विभागातील विविध मुद्द्यांच्या आधारे तीन टप्प्यात मूल्यांकन करण्यात आले. या अभियानात शालेय इमारत, वर्गखोल्या, फर्निचर, आरोग्यविषयक सुविधा, कचरा व्यवस्थापन, परसबाग विकसन, आनंददायी शिक्षण, विद्यार्थी लाभाच्या योजना, विद्यार्थी गुणवत्ता विकसनासाठी राबविण्यात आलेले विविध उपक्रम व त्या उपक्रमांची परिणामकारकता, शासनाच्या माध्यमातून घेतलेली विविध अभियान व त्यातील शाळा, विद्यार्थी, पालक यांचा सहभाग, शाळा आणि पालक संपर्क, विद्यार्थी अध्ययन निष्पत्ती या व अशा विविध विभागानुसार मूल्यांकन करण्यात आले.
ग्रामीण भागात असूनही जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेने पंचायत समिती रत्नागिरीच्या गटशिक्षणाधिकारी प्रेरणा शिंदे यांच्या प्रोत्साहनाने आणि गणपतीपुळे प्रभागाच्या शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली, केंद्रप्रमुख दिपक सुतार, अरुण जाधव, एकनाथ महाकाळ यांच्या सहकार्याने मुख्याध्यापक माधव अंकलगे, सहशिक्षिका राधा नारायणकर यांनी शालेय समित्या, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ यांच्या विशेष पुढाकाराने, मोठ्या प्रमाणात वरील विभागात काम करत अपेक्षित गुण मिळवत तृतीय क्रमांक पटकावला आहे.
यासाठी शाळेला नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, शिक्षणाधिकारी बी. एम. कासार, उपशिक्षणाधिकारी संदेश कडव, दत्तात्रय सोपनूर यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, रोख रक्कम देऊन या अभियानातील यशाबद्दल गौरविण्यात आले. हा सन्मान स्वीकारण्यासाठी शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्वाती धनावडे, ग्रुप ग्रामपंचायत वाटद मिरवणेचे सरपंच अमित वाडकर, शाळा विकास समितीचे अध्यक्ष आणि शाळा प्राधिकरण सदस्य अप्पा धनावडे, विश्वनाथ शिर्के, शाळेचे शिक्षक उपस्थित होते.
ग्रामीण भागात असूनही सातत्याने गुणवत्ता विकासासह विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करून या अभियानात मिळविलेल्या यशाबद्दल जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी या शाळेचे सर्व स्तरातून अभिनंदनासह कौतुक करण्यात येत आहे.