दापोली : दापोलीतील शंभरहून अधिक शेतकऱ्यांनी मुख्य मार्गावर स्टॉल टाकून कंदमुळांची विक्री केली. येथे येणाऱ्या परजिल्ह्यातील पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन निर्माण झाले आहे. या उत्पन्नातून प्रत्येकाला 25-30 हजारांचे उत्पन्न मिळत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
सद्या कंदमुळे दापोली बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी दिसत आहेत. स्थानिकांची ही कंदमुळे खरेदी करण्यासाठी गर्दी होतच असते; परंतु आता दापोलीत येणारे पर्यटक शेतकऱ्यांनी पिकवलेल्या पालेभाज्या आणि कंदमुळांना पसंती दर्शवत आहेत. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना फायदा होत आहे. उपवासाच्या दिवशी किंवा सॅलेडमधून किंवा भाजी करून कंदमुळे खाण्याची पद्धत आहे. जमिनीखाली दडलेल्या या कंदमुळांमध्ये भरपूर प्रमाणात पोषकतत्व असतात ज्यामुळे त्वरित ऊर्जा मिळू शकते. तालुक्यातील शेतकरी हिवाळ्याच्या हंगामात वेगवेगळ्या पालेभाज्या आणि कंदमुळे विक्रीसाठी दापोली शहरात आणतात. आपटी, नारगोली, वाकवली, उन्हवरे, आंजर्ले, कुडावळे, पंचनदी, कोळथरे, लाडघर, मुरूड, बांधतिवरे, सारंग, ताडील या गावांमध्ये नदीकिनारी वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या पिकवल्या जातात. शेतकऱ्यांच्या या शेतीमालाला सध्या पर्यटक पसंती दर्शवत आहेत. यातून येथील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ होत असून, यामुळे गावांमध्ये रोजगाराच्या संधीदेखील उपलब्ध होत आहेत. कोकणातील ग्रामीण भागात कंदमुळांची शेती केली जाते. काही कंदमुळे नैसर्गिकपणे जंगल परिसरात मिळतात. त्यांचा शोध घेऊन शेतकरी विक्रीसाठी बाजारात आणतात. वेगवेगळ्या प्रकारच्या दापोलीच्या मातीत नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या पालेभाज्या आणि कंदमुळे पर्यटकांना आवडतात. त्यामुळे या कंदमुळे आणि पालेभाज्यांच्या खरेदीला सकाळची झुंबड उडत आहे.
30 हजारांचे उत्पन्न
तालुक्यात शंभरहून अधिक शेतकरी कंदमुळाची लागवड करतात. त्यामधून साधारणपणे प्रत्येकी २५ ते ३० हजार रुपये उत्पन्न मिळेत. जून महिन्यात कंदमुळांची लागवड केली जाते आणि ऑक्टोबरमध्ये ती काढली जातात. दापोली तालुक्यात आपटी बोरघर, चिखलगाव, कुडावळे या गावांमध्ये कंदमुळाची शेती केली जाते. कंदमुळांचा जानेवारीपर्यंतच हंगाम असतो. सुरण, गवती चहा, अळूवडीची पाने, घोरकेन, आंबट बोरे, काजूगर, काठीकणगर, करंद, आंबेडा, गोडकोकम आदींना पर्यटकांकडून मोठी मागणी आहे. दापोलीत येणाऱ्या पर्यटकांचा स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होत आहे, असे नारगोली येथील शेतकरी नरेंद्र कुटरेकर यांनी सांगितले.