चिपळूण : वंचित बहुजन आघाडीचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास उर्फ अण्णा जाधव यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या विरोधात 12 डिसेंबर रोजी वंचितकडून मार्चाचे आयोजन करण्यात आले. असे असतानाच या हल्ल्यातील हल्लेखोरांना पोलिसांनी पकडले आहे. याशिवाय लागू असलेली मनाई आदेश व कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नचाविचार करता प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांनी मंगळवारी या मोर्चाची परवानगी नाकारली आहे.
जाधव यांच्या गुहागर तालुक्यातील नरवण येथे 17 नोव्हेंबर रोजी हल्ला झाला होता. यात ते जखमी झाले होते. याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा देखील झाला होता. या हल्ल्ल्यातील हल्लेखोराच्या शोधासाठी पोलीस यंत्रणा गतीमान झाली होती. असे असताना जाधव यांनी या हल्ल्याच्या निषेधार्थ वंचिततर्फे 12 डिसेंबर रोजी गुढेफाटा ते बहादूरशेख नाका आणि तेथून चिपळूण उपविभागिय पोलीस अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चास प्रांत कार्यालयाकडून परवानगी देण्यात आली होती. असे असताना सोमवारी या हल्ल्यातील 2 हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. तसेच या हल्ल्याचा अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. यासर्व बाबी लक्षात घेता लागू असलेला मनाई आदेश व निर्माण होणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अशा स्थितीत मोर्चाचे आयोजनास परवागनी देणे उचित नाही असा फेर अभिप्राय चिपळूण पोलिसांनी उपविभागीय अधिकारी कार्यालयास दिला. त्यानुसार 12 डिसेंबर रोजी वंचिततर्फे होणाऱ्या मोर्चाची प्रांताधिकारी लिगाडे यांनी फेर आदेश काढून परवागनी नाकारली आहे.