राजापूर : तालुक्यातील धोपेश्वर तिठवली येथील आंबा बागेतील नेपाळी कामगाराने आंबा बागेतच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली असून आत्महत्या करण्याचे कारण अद्यापही समजू शकले नाही.
ही घटना शनिवार सायंकाळी 5 ते रविवार 8 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वा. या कालावधीत घडली. बिरेंद्र बहादूर बगाले मगर (20, मूळ रा. कैलाला, नेपाळ सध्या रा. धोपेश्वर तिठवली, राजापूर) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या नेपाळी कामगाराचे नाव आहे. या बाबत बाग मालकाने राजापूर पोलीस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार, बिरेंद्र हा त्यांच्या आंबा बागेत कामाला होता. शनिवारी सांयकाळ ते रविवारी दुपारच्या कालावधीत त्याने अज्ञात कारणातून बागेतीलच एका आंबा झाडाच्या फांदीला पिवळ्या रंगाच्या दुपट्टयाने गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.