अभिनेता अल्लू अर्जूनचा ‘पुष्पा -2’ चित्रपट प्रदर्शनापासून चांगलाच चर्चेत आहे. तिकीटबारीवर दमदार कामगिरी करणाऱ्या या चित्रपटासंदर्भातील काही वाद सध्या चर्चेत असून एका महिला चाहतीचा सिनेमागृहाबाहेरील चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याने अभिनेता अल्लू अर्जूनसहीत निर्मात्यांवर टीका होताना दिसत आहे.
कोणी धमकी दिली?
राजपूत समाजाचे नेते राज शेखावत यांनी रविवारी ‘पुष्पा 2’ चित्रपटाच्या निर्मात्यांना धमकी दिली आहे. अल्लू अर्जून आणि रश्मिका मंधाना यांचा हा चित्रपट क्षत्रियांचा अपमान करणारा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या चित्रपटामध्ये फहाद फैसीलने भवर सिंह शेखावत नावाची पोलीस अधिकाऱ्याची नकारात्मक भूमिका साकारली आहे. याच भूमिकेवर आता करणी सेनेच्या नेत्यांची आक्षेप नोंदवला आहे.
नेमकं काय म्हटलंय?
शेखावत यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन, “पुष्पा 2 मध्ये शेखावत नाव असलेल्या व्यक्तीची नकारात्मक भूमिका दाखवण्यात आली आहे. हा क्षत्रीयांचा अपमान आहे. करणी सैनिक तयार आहेत. लवकरच या चित्रपटाच्या निर्मात्यांना चोप दिला जाईल,” असं म्हटलं आहे. या चित्रपटामध्ये शेखावत नावावरुन अनेकदा अपमानास्पद वक्तव्यं करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा शेखावत समाजाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. हा शब्द चित्रपटामधून निर्मात्यांनी काढून टाकावा अशी मागणी राज शेखावत यांनी केली आहे.
तो शब्द वगळावा
“या चित्रपटाने क्षत्रियांचा अपमान केला आहे. शेखावत समाजाला नकारात्मक दृष्टीकोनातून दाखवण्यात आलं आहे. स्वातंत्र्याच्या नावाखाली इंडस्ट्री शेखवत समाजाला बदनाम करत आहे. त्यांनी आता पुन्हा तेच केलं आहे,” असं राज शेखावत यांनी म्हटलं आहे. “या चित्रपटामध्ये वारंवार वापरण्यात आलेला शेखावत शब्द निर्मात्यांनी वगळावा. नाहीतर करणी सेना त्यांच्या घरात घुसून त्यांना मारेल. गरज पडल्यास आम्ही काहीही करु शकतो,” असा इशारा राज शेखावत यांनी दिला आहे.