खेड : तालुक्यातील तिसंगी येथील दांडग्याचा माळ येथील जंगलात बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची दारू गाळत असताना खेड पोलिसांच्या पथकाने शनिवारी सायंकाळी एकाला रंगेहाथ पकडले. देवानंद महिपत भोसले (५०, रा. तिसंगी-पिंपळवाडी, खेड) असे त्याचे नाव असून, या धाडीत १ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
देवानंद भोसले हा जंगलमय भागात विनापरवाना गावठी दारू बनवण्यासाठी लागणारे साहित्य जवळ बाळगत गावठी हातभट्टीची दारू गाळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या भागात सापळा रचला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दारू गाळण्यासाठी ३५ हजारांची एक मोठ्या आकाराची १ हजार मापाची लोखंडी पत्र्याची टाकी जप्त केली.
अवैध दारू तसेच एका अर्धवट टाकीत गूळ नवसागरमिश्रित गरम रसायन आढळले. तीन ठिकाणी बांधलेल्या स्टीलच्या परातीचा बनवलेला चाँटू आणि त्याच्यावर जर्मनचे गोल आकाराचे ठेवलेले भांडे, पत्र्याची टाकी व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले. ७७ हजार रुपये किमतीची ५०० लिटर मापाच्या काळ्या रंगाच्या प्लास्टिकच्या ४ टाक्यांमध्ये गावठी हातभट्टीची दारू, तसेच १५०० लिटर गूळ नवसागरमिश्रित तयार केलेले कुजके रसायनही टाकीसह पोलिसांनी हस्तगत केले. याप्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल प्रशांत वाघ यांनी पोलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.